पाचवड-कुडाळ रस्त्यावर वाहतूक पोलिसांकडून नियमांची पायमल्ली
आडोशाला उभे राहून होतेय वसुली: वाहनधारकांचा आरोप
कुडाळ : प्रतिनिधी - ( टिम दिव्यदृष्टी नामा न्यूज ) -
पाचवड ते खेड या नवीन राष्ट्रीय महामार्गचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे.या रस्त्यालगत जावली तालुक्याच्या हद्दीत गेली काही दिवसांपासून वाहतूक पोलीस कर्मचारी वाहनधारकांना अडवून त्यांची तपासणी करत आहेत. यात विनापरवाना,परमिट नसताना देखील वाहतूक करणाऱ्या वाहनांवर या वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांकडून कोणतीही कारवाई केली जात नसल्याचे वाहनधारक तसेच नागरिकांमधून बोलले जात आहे.त्यामुळे ज्याची सर्व कागदपत्रे योग्य आहेत अशा वाहनधारकांना अडवून त्यांचा वेळ वाया घालवण्याचा प्रकार सध्या जावली तालुक्यातील पाचवड-कुडाळ रस्त्यावर सुरू आहे.एका वळणावर वाहतूक पोलीस कर्मचारी आपली दुचाकी आडोशाला उभी करून राजरोसपणे ड्युटीच्या नावाखाली वसुली करताना दिसत आहेत.
रस्त्यावर असे उभे राहून गाडी अडवली जात असून वाहनधारकांना ये-जा करताना अनेक अडीअडचणींचा सामना करावा लागत आहे.यात सध्या शेतीच्या कामांना वेग आला असून जो-तो शेतकरी शेतीसाठी आवश्यक असणारे साहित्य आणण्यासाठी पाचवडकडे तर कधी कुडाळकडे ये-जा करत असतात त्यांना देखील थांबवून त्यांच्या कागदपत्रांच्या तपासणीच्या नावाखाली २००,४००,५०० रुपये घेत असल्याचा आरोप वाहनधारक करू लागले आहेत.
ओव्हरलोड गाड्या,भंगार व्यवसायिकांच्या गाड्या,परमिट नसलेली वाहने यांना थांबवण्याचे देखील कष्ट कुटे व जगदाळे नामक वाहतूक पोलीस करत नसल्याचे वाहनधारकांकडून बोलले जात आहे. याउलट त्यांना रसत पुरवली जात असल्याचे निदर्शनास येत आहे. वास्तविक पाहता राष्ट्रीय महामार्ग लगत तीव्र वळणावर अश्या वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांची नेमणूक योग्य आहे का? असा सवाल वाहानधारकांमधून उपस्थित केला जाऊ लागला आहे.तसेच राष्ट्रीय महामार्गावर वाहनांची तपासणी करण्याच्या नावाखाली वाहतूक पोलीस कर्मचारीच मोबाईलवर बोलत वाहने न पाहता रस्ता क्रॉस करत असल्याचे वाहनधारकांनी केलेल्या व्हिडिओ चित्रीकरणातून दिसून येत आहे.त्यामुळे जर वाहनधारकांकडून नियमांची पायमल्ली केली गेली तर त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला जातो पण अशा निष्काळजी व चुकीच्या पद्धतीने गाड्या अडवणाऱ्या वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांवर नेमकी कोणती कारवाई वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून केली जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
वाहनधारकांकडून चिरीमिरी रुपये घेण्याचा प्रकार वाहतूक पोलीस कर्मचारी करत असल्याचे जावली तालुक्यातील वाहनधारक व नागरिकांमधून बोलले जात आहे. अशा बेफिकीरपणे गाड्या अडवून तपासणी करणाऱ्या वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांवर नूतन पोलिस अधीक्षक कारवाई करणार का असा सवाल वाहनधारक व स्थानिक नागरिक उपस्थित करू लागले आहेत.
पाचवड ते खेड या राष्ट्रीय महामार्गाचे काम गेल्या सहा महिन्यापासून सुरू आहे. सरताळे येथे असणाऱ्या तीव्र वळणावर वाहतूक पोलीस कर्मचारी उभे राहून ओळखीच्या वाहनांना मोकळे सोडत कागदपत्रे असणाऱ्या वाहनांना पकडत सुसाट असणाऱ्या वाहनांवर कोणतीही कारवाई करत नाहीत असे वाहनधारकांमधून बोलले जात आहे.

