जावली तालुक्यात दि २ रोजी केळघर व ३ जून रोजी मेढा येथे आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन ; तहसीलदार यांचे उपस्थित राहण्याचे आव्हान
केळघर : प्रतिनिधी - (टीम दिव्यदृष्टी नामा न्यूज ) - महाराष्ट्र शासनाच्या तहसीलदार कार्यालय, जावळी (मेढा), यांच्यावतीने आपत्ती व्यवस्थापन व पूर्व तयारी संदर्भात विशेष प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रशिक्षण मंगळवार दि २ रोजी सकाळी १० वा केळघर येथील मैत्री पार्क येथे तर बुधवार दि. ३ जून २०२६ रोजी सकाळी १० वाजता पंचायत समिती जावळी येथील सभागृहात पार पडणार आहे. अशी माहिती जावलीचे तहसिलदार प्रविण मुलगूल यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.
दरड कोसळणे, पूरस्थिती, आग लागणे तसेच इतर नैसर्गिक आपत्तींच्या पार्श्वभूमीवर शासकीय यंत्रणा व ग्रामस्तरावरील समित्यांची तयारी अधिक सक्षम करण्यासाठी या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती तहसीलदार कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
या प्रशिक्षणात गावातील आपत्ती व्यवस्थापन समिती सदस्य, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, मंडळ अधिकारी, तलाठी, पोलीस पाटील, ग्रामसेवक, कृषी सेवक, अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका, वनपाल, युवक मंडळ सदस्य तसेच संबंधित कर्मचारी व नागरिकांना उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
प्रशिक्षणादरम्यान आपत्तीपूर्व तयारी, आपत्कालीन परिस्थितीत बचावकार्य, नागरिकांचे सुरक्षित स्थलांतर, प्राथमिक मदत, समन्वय यंत्रणा आणि आपत्तीच्या काळात प्रशासनाशी संपर्क कसा ठेवावा याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
जिल्हाधिकारी सातारा यांच्या निर्देशानुसार २०२६ या वर्षात आपत्ती व्यवस्थापन क्षमता वाढविण्यावर विशेष भर देण्यात येत असून, ग्रामीण भागातील नागरिक व कर्मचारी यांना प्रत्यक्ष प्रशिक्षणाद्वारे सज्ज करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न असल्याचे सांगण्यात आले.
या वर्षी करिता मान्सुनपुर्व प्रशिक्षण घेणेचे नियोजन करणेत आलेले आहे. सदर प्रशिक्षण हे आपत्ती व्यवस्थापन केंद्र, यशदा पुणे येथील मास्टर ट्रेनर, यांचेमार्फत शोध व बचाव कार्यपध्दती, प्रथमोपचार पदधती, आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत उपलब्ध साहित्याचा वापर, तसेच आपत्ती दरम्यान काय करावे अथवा काय करू नये याबाबत सखोल मार्गदर्शन करणार आहेत.
त्या अनुषंगाने वर नमुद केलेल्या सर्व गाव आपत्ती समितीतील सर्व सदस्य, सरपंच व ग्रामपंचायत सदस्य, मंडलाधिकारी सर्व संबंधित ग्रामस्थ, पदाधिकारी, सेवक व युवकांनी वेळेत उपस्थित राहून प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आपत्ती व्यवस्थापन कमिटीचे अध्यक्ष तथा तहसिलदार जावली (मेढा ) प्रविण मुगदुल यांनी केले आहे.
