गेली १५० वर्षे अगणित वाटसरुंचे विसावा स्थान असणारा रामजीबुवाचा पूल गेला काळाच्या पडद्याआड

0

 

आंबेघर -येथील वेण्णा नदीवरील   रामजी बुवा पुलाचा शेवटचा क्षण



गेली १५० वर्षे अगणित वाटसरुंचे विसावा स्थान असणारा रामजीबुवाचा पूल गेला काळाच्या पडद्याआड


केळघर : प्रतिनिधी- ( टिम दिव्यदृष्टी नामा न्यूज ) -  महाबळेश्वर ते विटा या राज्यमार्गाचे काम नव्याने पूर्ण झाले असून या मार्गावर महत्वपूर्ण असणारा , तब्बल दिडशे वर्षे अविरत सेवा देणारा , अनेक घटनांचा साक्षीदार असलेला आंबेघर येथील रामजीबुवा मंदिरालगतचा वेण्णा नदीवरील ब्रिटीश कालीन पूल आज मकर संक्राती दिवशी काळाच्या पडद्याआड गेला . याठिकाणी नव्याने पुलाची उभारणी करण्याचे काम गतिमान झाले आहे .

        आंबेघर तर्फे मेढा (ता जावली ) येथील अनेक घटनांचा साक्षीदार असलेला हा वेण्णा नदीवरील पूल अजूनही दिमाखदार सेवा देत होता .महाबळेश्वर ते विटा  या राज्यमार्गावर केळघर - मेढा सातारा या मार्गावरचा हा अत्यंत महत्त्वाचा पूल . ना . शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सन २०२० साली या महाबळेश्वर ते विटा  या राज्यमार्गाचे   विकासासाठी जवळपास चारशे कोटीचा निधी केंद्र सरकारकडून उपलब्ध करण्यात आला मात्र ठेकेदाराच्या दिरंगाईमुळे या पुलाचे तसेच केळघर बाजारपेठेतील एका लेनचे , बसस्टॉपची तसेच किरकोळ कामे रखडली . मात्र आता बांधकाम मंत्री ना शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी नव्याने या पुलासाठी आठ कोटी निधी उपलब्ध करून दिला आहे .             या मार्गावरील वाहतुकीस महत्त्वपूर्ण असणारा केळघर - मेढा - सातारा या रस्त्यावरील हा पूल अनेक घटना , इतिहासाचा साक्षीदार आहे . आंबेघर तर्फ मेढा येथील रामजीबुवा मंदिराजवळ हा वेण्णा नदिवरील पूल ब्रिटीशकालीन असून आर्च पद्धतीने कोरीव दगड , चुण्याच्या मिश्रणात बांधलेल्या या पुलाला १५० वर्षे झाली असून अजूनही रहदारी चालू आहे या पुलाच्या इतिहासात पहिल्यांदा जुर्ले २०२१ ला वेण्णा नदीला आलेल्या महापूरात या पुलावर पाच फूट पाणी होते . तरीही हा पूल दिमाखात उभा होता . अनेक स्थितंतरे या पुलाने पाहिली . अगदी बैलगाडीतून देशावरून  कोकणात व्यापारासाठी जाणाऱ्या शेतकरी , व्यापाऱ्यांना केळघर घाट चढून, अंबेनळी घाट उतरून जावे लागे तसेच ब्रिटीशांनाही महाबळेश्वर या थंड हवेच्या ठिकाणी जाण्यासाठी त्यांनी या रस्ता, पुलाची बांधणी केली होती . तर रस्त्याच्या दुतर्फा लावलेले वटवृक्ष आजची वाटसरूंना शितल छाया देत होते . आता तेही रस्ता रुंदीकरणात काळाच्या पडद्याआड गेले . तर ठेकेदाराने नव्याने लावलेली झाडे कुठे आहेत .  पहिल्यांदाच या पुलाने असा महापूर अनुभवला आणि निभावलाही असे ज्येष्ठ जाणकार सांगतात . या पुलाची कालमर्यादा संपली असली तरी अजूनही तो दिमाखात सेवा बजावत होता . शेजारीच प्रवाशांचे श्रध्दास्थान असलेल्या रामजी बुवाचे मंदिरात , शेडमध्ये अनेकजण प्रवासातून थकून - भागून विश्रांती घेत .



     असा हा ऐतिहासिक पूल काळाच्या पडद्याआड जात असला तरी तो अनेक घटनांचा साक्षीदार आहे नव्याने होत असलेला पूलही असाच दर्जेदार व पावसाळ्या पूर्वी तयार व्हावा अशी अपेक्षा  येथे विसाव्यासाठी थांबणाऱ्या वाटसरू , प्रवाशी वर्गातून होत आहे . सदर पुलाबाबत सार्वजनिक बांधकाम जावली उपविभागाचे उपअभियंता श्री पवार यांच्याशी संपर्क साधला असता ते उपलब्ध होऊ शकेल नाहीत .


      


       




Post a Comment

0Comments
Post a Comment (0)