महाबळेश्वर दर्शनासाठी आलेली भूम आगाराची बस नादुरुस्त;
महाबळेश्वर आगाराने उपलब्ध करून दिली बस
केळघर: प्रतिनिधी- ( टिम दिव्यदृष्टी नामा न्यूज ) - शालेय विद्यार्थ्यांना सहलीसाठी राज्य परिवहन मंडळाच्या बसेस वापराव्यात असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले होते. त्यामुळे यावर्षी प्रशासनाच्या वतीने जास्तीत जास्त सहलीसाठी शालेय विद्यार्थ्यांना एसटी बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. महाबळेश्वर, पाचगणी, प्रतापगड हे महाराष्ट्रातील प्रमुख पर्यटन स्थळे असल्याने येथे राज्याच्या कानाकोपऱ्यातून अगदी विदर्भ,मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र येथून शैक्षणिक सहली ही महाबळेश्वर ला यावर्षी तुलनेने जास्त आल्या होत्या. धाराशिव जिल्ह्यातील भूम आगाराची बस विद्यार्थ्यांना घेऊन महाबळेश्वर दर्शनासाठी दोन दिवसांपूर्वी आली होती. क्षेत्र महाबळेश्वर परिसरात ही सहलीची बस अचानक बंद पडली. चालकाने प्रयत्न करून ही बस सुरू होत नव्हती. बसमध्ये लहान मुलांची संख्या जास्त होती. त्यामुळे शिक्षक चिंतातुर झाले .बस बंद पडल्याची माहिती पालकांपर्यंत पोचल्याने पालक ही काळजी करत होते. शिक्षकांनी व चालकांनी महाबळेश्वर आगाराचे आगार व्यवस्थापक महेश जाधव यांच्याशी दूरध्वनी वरून संपर्क साधून बस बंद पडल्याची माहिती त्यांनी दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून आगार व्यवस्थापक जाधव यांनी महाबळेश्वर आगारातील वाहन परिक्षक सुनील नायकुडे व सहायक मोहन साळुंखे यांना पर्यायी बस घेऊन बस बंद पडलेल्या ठिकाणी पाठवले. एक ते दीड तासांच्या प्रयत्नाने बंद पडलेली बस सुरू करण्यात आली. तोपर्यंत या विद्यार्थ्यांना महाबळेश्वर आगाराची पर्यायी बस देण्यात आली. तातडीने पाऊले उचलून बस उपलब्ध करून दिल्याबद्दल शिक्षकांनी व विद्यार्थ्यांनी महाबळेश्वर आगाराच्या तत्परतेने कौतुक केले.पालकांनी ही फोनवरून संपर्क करून आगार व्यवस्थापक जाधव यांचे आभार मानले.
महाबळेश्वर हे राज्यातील प्रमुख पर्यटन स्थळ असल्याने येथे राज्यभरातून सहलींच्या बसेस मोठ्या प्रमाणात येतात. सहलीची गाडी मार्गस्थ बिघाड झाली तर महाबळेश्वर आगाराच्या वतीने तातडीने मदत पुरवली जाते. त्यामुळे मार्गस्थ बिघाड झाला तरी माहिती मिळाली की लगेच कार्यवाही केली जाते. महाबळेश्वर आगारात शैक्षणिक सहलींच्या गाड्यांचे काम निघाले तरी कार्यशाळेत तातडीने केले जाते.महाबळेश्वर हा दुर्गम व डोंगराळ तालुका असून देखील महाबळेश्वर आगाराच्या वतीने प्रवाशांना सर्वात्तम सेवा दिली जाते. आगारातील कामगारांच्या सहकार्याने पुढील काळात देखील प्रवाशांना उत्तमोत्तम सेवा देणार आहे.
- महेश जाधव .आगार व्यवस्थापक ,
महाबळेश्वर आगार

