जिद्द ,चिकाटी आणि कठोर मेहनतीतून अजयची पीएसआय पदाला गवसणी ; युवकांसाठी प्रेरणादायी प्रवास
केळघर : प्रतिनिधी - ( टिम दिव्यदृष्टी नामा न्यूज ) -
यशाची खरी कहाणी ही अपयश, चिकाटी आणि कठोर मेहनतीतून घडत असते. ती केवळ ध्येय गाठण्याची नाही तर पडल्यावर पुन्हा जोमाने उभे राहण्याची जिद्द आहे. कुटुंबाच्या आर्थिक परिस्थितीवर मात करून पहिल्याच प्रयत्नात पोलीस उपनिरीक्षक पदाला गवसणी घालण्याची कामगिरी करणाऱ्या जावळी तालुक्यातील केडंबे गावातील अजय नामदेव सुतार या युवकाची यशोगाथा तरुणांसाठी प्रेरणादायी आहे.
नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत अजय सुतार याची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाली आहे. सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील अजयची निवड ही प्रशंसनीय आहे. हवालदार ते पोलीस उपनिरीक्षक या प्रवासात चढ-उताराचा सामना करून अजय सुतार याने हे यश मिळवले आहे.
अजयचे प्राथमिक शिक्षण हे केडंबे (ता. जावळी) येथील जिल्हा परिषद शाळेत झाले. आणि पुढे ८ वी ते १० वी पर्यंतचे शिक्षण श्री.भैरवनाथ विद्यालय केळघर च्या भागशाळेत पूर्ण झाले. दहावीमध्ये ८५% गुण मिळवून अजय वर्गात द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण झाला.
पुढील शिक्षणासाठी त्याने यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स सातारा येथे प्रवेश घेतला, पण त्याच वेळी त्याच्या आयुष्यात मोठे वादळ आले.त्याच्या आईची तब्येत खूप खालावली.तिच्या उपचारासाठी वडिलांकडे पैसे नव्हते, शेवटी कर्ज काढून, नातेवाईकांकडून मदत घेऊन तिचे उपचार केले कशीबशी ती आजारातून बरी झाली पण पैसे नसल्यामुळे कुटुंबाची आर्थिक परिस्थिती पूर्णपणे ढासळली होती.
अशी वेळ आली की अजयला पुढील स्वतःच्या शिक्षणासाठीही पैसे नव्हते. काही वेळा तर मासिक पास काढण्यासाठीही मित्रांकडून पैसे घेतले, तसेच गावातील काही ग्रामस्थानी मदत पण केली . शेवटी अजयने कठीण निर्णय घेतला तो देखील घरच्यांच्या विरोधात जाऊन की मी माझे शिक्षण थांबणार असा आणि मी ते थांबवले सुध्दा. घरी हातभार लावण्यासाठी दिवसाला ३०० रुपये हजेरीवर कामावर अजय कामावर जात असे.
जवळपास १० महिने काम केले .त्यावेळी अजयच्या मनात विचार आला की, माझं पुढच करिअर संपल.मनात खूप नकारार्थी विचार यायचे. पण माझे मन मला शांत बसून देत नव्हते मला जाणवलं—हे माझं अंतिम ठिकाण हे नाही… मला अजून पुढे जायचं आहे. आणि तिथूनच मी पुन्हा शिक्षण सुरू करण्याचा निर्णय घेतला.
सुट्टीच्या दिवस काम आणि बाकी दिवशी कॉलेजमध्ये शिक्षण … अशा परिस्थितीत मी ११ वी-१२ वी कॉमर्स पूर्ण केली आणि १२ वीमध्ये मेढा येथील आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालयातून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालो. तेथील शिक्षक आणि मित्रांनी दिलेली साथ ही अजयच्या वाटचालीस मोठी ताकद ठरली.
पुढे अजयने पोलीस भरतीचा निर्णय घेतला. त्यासाठी मेढा येथील जावळी करियर अकॅडमी मध्ये प्रवेश घेतला. तिथे पण फी भरण्यासाठी अजयकडे पैसे नव्हते. तेव्हा अजयने जावळी करिअर अकॅडमीचे संतोष कदम सर यांना सांगितले की मला 12 वी कॉमर्स मध्ये अकाउंट या विषयात 94 गुण आहेत आणि खूप विद्यार्थ्यांना तो विषय अवघड जातो. जर तुम्ही संधी दिली तर मी आपल्या अकॅडमी मध्ये आमदार आणि वेण्णा कॉलेजच्या विद्यार्थ्यांना शिकवू शकतो .या आत्मविश्वासावर कदम सर यांनी अजयला तिथे शिकवण्याची संधी दिली. जवळजवळ 70 विद्यार्थ्यांना अजय अकाउंट विषय शिकवत होता. अशा प्रकारे अजयचा अकॅडमीचा खर्च भागला., पुढील शिक्षण पण करत होतो आणि घरालाही थोडाफार आर्थिक हातभार लावला.त्यातच अकॅडमी मध्ये अजयने जोमाने पोलिस भरतीचा अभ्यास सुरू केला. पण
यापूर्वी कधीच शारीरिक सराव नसल्यामुळे सुरुवातीला खूप त्रास अजयला सहन करावा लागला. खुपदा दुखापत झाली पण अजयने जिद्द सोडली नाही. शेवटी भरती निघाली की अजय रिक्त जागांच्या भरतीत मुंबई पोलीस दलात पहिल्याच प्रयत्नात 20 व्या वर्षी भरती झाला. तेथील पोलिस ट्रेनिंग सेंटरमध्ये 10 महिन्यांचे खडतर प्रशिक्षण घेतले. आणि पोलीस कॉन्स्टेबल या पदावर ड्यूटीवर अजय रुजू झाला. पण त्याला पुढे मोठे अधिकारी बनायचेच होते.ते स्वप्नच होते त्यामुळे इथेच थांबायचं नव्हतं.
ड्युटीवर असताना १२-१२ तास ड्युटी करत असताना सुद्धा अजयने MPSC चा अभ्यास चालू ठेवला. वेळ कमी पडत होता, म्हणून युनिट बदलून जलद प्रतिसाद पथक, कालिना येथे अजय रुजू झाला. तिथे ४ महिन्यांचे कठोर कमांडो ट्रेनिंग पूर्ण केले.तिथे 12 तास ड्युटी आणि २४ तास मिळणाऱ्या विश्रांतीत त्याने पूर्ण ताकदीने अभ्यास केला.
आणि शेवटी अजयच्या कष्टाचे चीज झाले. अजयने पोलीस उपनिरीक्षक पद पहिल्याच प्रयत्नात मिळवले आहे.
माझ्या या यशात माझ्या कुटुंबाचा, मित्रांचा, शिक्षकांचा आणि पोलीस खात्यातील अधिकारी व सहकाऱ्यांचा खूप मोठा वाटा आहे. असे अजयने यावेळी सांगितले.
आज जो हा सुवर्ण दिवस मी पाहतोय, तो माझे आई-वडील, कुटुंबीय,मित्र, शिक्षक, व पोलीस खात्यातील अधिकारी यांनी वेळोवेळी दिलेल्या पाठिंब्यामुळेच शक्य झाले आहे.
त्यांचे हे ऋण मी आयुष्यभर विसरणार नाही.शेवटी जाताजाता एक वाक्य बोलतो की अडचणी येतात खूप आयुष्यात पण त्या येताना कुठेतरी संधीसुद्धा घेऊन येतात त्याच संधीचे सोने करा. - अजय सुतार
सामान्य कुटुंबातील अजय सुतार हे यश प्रेरणादायी असून आर्थिक परिस्थिती बिकट असली तरी जिद्द, कठोर परिश्रम व ध्येय गाठण्यासाठी अविरत परिश्रम घेतले तर अशक्य काहीच नाही. हे अजय सुतार याने दाखवले आहे. अजय यांच्या या यशाबद्दल त्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई , सार्वजनिक बांधकाम मंत्री छ . शिवेंद्रसिंहराजे भोसले , ग्रामस्थ मंडळ केडंबे ,यांच्यासह मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.

