राजे चंद्रराव मोरे कुलोत्पन्न” जावलीकर ‘राव’ मोरे परिवाराचे “ऐतिहासिक प्रथम स्नेहसंमेलन” पनवेल येथे उत्साहात संपन्न.

0

 

पनवेल - मोरे परिवाराच्या स्नेहसंमेलन प्रसंगी राज्यभरातून उपस्थित असलेला मोरे परिवार

 
राजे चंद्रराव मोरे कुलोत्पन्न” जावलीकर ‘राव’ मोरे परिवाराचे
“ऐतिहासिक प्रथम स्नेहसंमेलन” पनवेल येथे उत्साहात संपन्न.


जावलीकर राव मोरे परिवार सामाजिक संस्था, मुंबई’ या संस्थेचा उपक्रम


केळघर ( जावली ) : प्रतिनिधी - ( टिम दिव्यदृष्टी नामा न्यूज ) - “राजे चंद्रराव मोरे कुलोत्पन्न ” जावलीकर ‘राव’ मोरे परिवाराचे ऐतिहासिक असे “प्रथम स्नेहसंमेलन”, ‘जावलीकर राव मोरे परिवार सामाजिक संस्था, मुंबई’ मार्फत आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह, पनवेल येथे आयोजित करण्यात आले होते. सदर स्नेह् संमेलनास ठाणे, पालघर, सातारा, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातून जवळपास ५० गावातील ६०० ‘राव’ मोरे परिवारातील बंधू-भगिनी उपस्थित होते.

          या स्नेहसंमेलना दरम्यान परिवारातील विविध क्षेत्रातील बंधू-भगिनींचा ‘राजे चंद्रराव’ पुरस्कार देऊन कौतुक करण्यात आले. यावेळी  श्री. निखिल निळकंठराव दरेकर यांना गोवंश संरक्षक पुरस्कार, कु. कोमल दिलीपराव मोरे व कु. धनश्री अनिलराव मोरे यांना शैक्षणिक  पुरस्कार, कु. निकिता जगन्नाथराव दरेकर, श्री. रुपेश राजारामराव मोरे, कु. सानिध्य संजयराव मोरे व श्री. अक्षय अरुणराव दरेकर यांना क्रीडा पुरस्कार, श्रीमती कमलाबाई रघुनाथराव मोरे यांना वीरनारी पुरस्कार, श्री. सुरेश शिवरामराव मोरे, श्री. प्रशांत दिलीपराव मोरे व श्री. वसंत चंद्रकांतराव मोरे यांना प्रशासकीय शौर्य पुरस्कार. शहीद कै. प्रकाश पांडुरंगराव मोरे व शहीद कै. सुभाष नारायणराव मोरे यांना मरणोत्तर शौर्य पुरस्कार तसेच श्री. संदीप दौलतराव मोरे व कु. ऋचा कृष्णकांतराव दरेकर यांना प्रशासकीय सेवा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. या प्रसंगी संस्थेच्या अधिकृत संकेत स्थळाचे देखील मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. 

        जावलीकर राव मोरे परिवाराच्या स्नेह्संमेलनास इतिहास अभ्यासक  सौ. शिल्पा प्रधान-परब यांनी सत्ययुग, द्वापारयुग, चंद्रगुप्त मौर्य ते साधारण १५०० पासून महाराष्ट्रात, जावळीत संघराज्य पद्धतीप्रमाणे सत्ता स्थापन करणारे ‘राजे चंद्रराव मोरे घराणे’ यांचा सत्ता प्रवास, त्यांचे न्यायनिष्ट व धर्मनिष्ठ कार्य तसेच त्या कालखंडातील राजकीय, भौगोलिक, सामाजिक परिस्थिती आणि आठव्या चंद्ररावांपासून स्वराज्य स्थापनेच्या संकल्पनेच्या संक्रमणाचा काळ, त्यावेळची सामाजिक, राजकीय बदलांबाबत अत्यंत स्पष्टपणे ऐतिहासिक दाखले देत विश्लेषण केले. चंद्रराव किताब व मोरचेल धारण करण्यास आदिलशहाने मान्यता दिली हे विधान चुकीचे कारण चंद्रराव घराणे स्वयंभू होते. “ यूनायटेड स्टेट्स ऑफ जावली ” संकल्पना सर्वप्रथम रुजवणारे असे हे घराणे. ‘स्वराज्य विरोधी’ राजे चंद्रराव मोरे घराणे या ‘बेताल बेबुनियाद’ आरोपांचे देखील त्यांनी अतिशय परखडपणे तत्कालीन विविध घटनांच्या आधारे खंडन केले. मोरे घराणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधी अथवा स्वराज्य-द्रोही कधीच नव्हते परंतु त्यावेळेचे राजकारण, सत्ताकारण ज्या पद्धतीने झाले ते तत्कालीन इतिहासकारांनी रंगवताना त्याची विनाकारण किंमत खोट्या-नाट्या आरोपांमुळे, तर्क-वितर्कांमुळे राजे चंद्रराव मोरे परिवाराला मोजावी लागली. स्वराज्य स्थापनेनंतर शिवछत्रपती आणि स्वराज्यासाठी आयुष्य वेचणाऱ्या आणि शौर्य गाजवलेल्या राजे चंद्रराव मोरे घराण्यातील रण-धुरंधरांचा देखील त्यांनी ऐतिहासिक दाखले देत गौरव केला. त्यामुळे जनमानसात मौर्य - मोरे घराण्याविषयी असलेले गैरसमज दूर होतील असे त्यांनी सांगितले.



संस्थेच्या व्यासपीठावरून नि:स्वार्थ भावनेने ‘राव’ मोरे परिवाराच्या हितार्थ, प्रत्यक्षात आकार घेऊ पाहणाऱ्या अनेक भावी महत्वाकांक्षी उपक्रमांबाबत व संस्था जडण-घडणी बाबत संस्था सचिव  विनोदराव मोरे यांनी परिवाराला मनमोकळेपणाने अवगत केले. संस्था अध्यक्ष  सुहासराव मोरे यांनी अध्यक्षीय भाषणात संस्थेमार्फत मोरे घराण्याचा “ऐतिहासिक संदर्भ ग्रंथ”, राजे चंद्रराव मोरे यांचे “तैलचित्र” येत्या काळात उपलब्ध केले जाईल, तसेच भावी पिढीला यथाशक्ती मार्गदर्शन, दिशा-दर्शक पर्याय उपलब्ध करून दिले जातील असे सांगितले. संस्थेच्या विविध उपक्रमांच्या यज्ञाचा हा घोडा असाच चौखूर मार्गक्रमण करेल असा त्यांनी विश्वास व्यक्त केला. सरतेशेवटी आपल्या ‘राव’ मोरे परिवाराच्या प्रत्येक घटकाची संस्थेला हक्काची साथ असावी असे भावनिक आवाहन करून समस्त ‘राव’ मोरे परिवार पहिल्यांदा इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याबद्दल आभार व्यक्त करण्यात आले .


Post a Comment

0Comments
Post a Comment (0)