चांगल्या प्रतीचा दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी फेकून दिलेली लोखो रुपयांची स्ट्रॉबेरी
स्ट्रॉबेरीचे दर कोसळल्याने शेतकरी हवालदिल
लाखो रुपयांचे शेतकऱ्यांचे नुकसान
कुडाळ : प्रतिनिधी - ( टिम दिव्यदृष्टी नामा न्यूज ) -
जावली तालुक्यातील कुडाळ,आखाडे सोमर्डी,महू,शिंदेवाडी आदी गावांमध्ये कमीत कमी 20 ते 22 हेक्टर जमिनीवर सप्टेंबर महिन्यात स्ट्रॉबेरी पिकाची लागण केली जाते.साधारपणे एकरी दीड ते दोन लाख रुपये भांडवल यासाठी द्यावे लागते.स्ट्रॉबेरी फळाची विक्री डिसेंबर महिन्यापासून सुरू होते. स्ट्रॉबेरीला पुणे, मुंबई तसेच जामचे चॉकलेट तयार करणाऱ्या कंपनीकडून मागणी होत असते.सध्या स्ट्रॉबेरी संपण्यास अजून दोन महिने कालावधी असतानाच अचानकपणे स्ट्रॉबेरीचा दर कोसळला असल्याने स्ट्रॉबेरी उत्पादक संकटात सापडला असून याचा मोठा फटका स्ट्रॉबेरी उत्पादकांना बसणार आहे.
सध्या स्ट्रॉबेरीला जामच्या चॉकलेट कंपनीतून मागणी कमी झाली असल्याने स्ट्रॉबेरीचे दर 20 ते 30 रुपयांवर आले आहेत. अचानकपणे स्ट्रॉबेरीचा दर कोसळल्याने आखाडे, कुडाळ व इतर गावातील शेतकऱ्यांनी तोडून ठेवलेला स्ट्रॉबेरी माल फेकून द्यावा लागला असल्याने शेतकऱ्याचे यामध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. स्ट्रॉबेरी या पिकाला कोणत्याही प्रकारचे विमा कवच नसल्याने या नुकसानीचे दाद कोणाकडे मागावी असा सवाल शेतकऱ्यांपुढे निर्माण झाला आहे. यावर्षी कमी प्रमाणात पाऊस झाल्याने पिकांना पाणी पुरेल का नाही अशी शंका शेतकऱ्यांच्या मनामध्ये निर्माण झाली असतानाच स्ट्रॉबेरी पिकाचे दर पडल्याने शेतकऱ्याला अनेक अडी-अडचणींचा सामना करावा लागणार आहे.
जावली तालुक्यातील रुपेश आंबुले, अजिंक्य गायकवाड, माणिक शिंदे, निलेश तरडे, राहुल ननावरे, संतोष अमराळे,दिलीप दरेकर, प्रदीप पवार, विकास कीर्वे,अजय पवार, शिवाजी भिलारे, हनमंत शिंदे आदी शेतकऱ्यांनी आपल्या शेतीत स्ट्रॉबेरी पीक घेतले आहे.
स्ट्रॉबेरी पिक लावत असताना लाखो रुपयांचे भांडवल शेतकऱ्यांना सुरुवातीला उभे करावे लागते. सरकारकडून कोणत्याही प्रकारचे विमा कवच स्ट्रॉबेरी पिकाला दिले जात नसून कोणत्याही प्रकारचे अनुदानही दिले जात नाही.अन्य पिकाला दिले जाणारे पीक विमा कवच हे स्ट्रॉबेरी पिकालाही लागू करण्यात यावे. या विमा कवचासाठी जे काही शुल्क भरावे लागेल ते स्ट्रॉबेरी उत्पादक भरतील. त्यांना या विमा कवचाचा लाभ मिळावा.
- स्ट्रॉबेरी उत्पादक - रुपेश आंबुले