काळाकडा - दोन जेसीबीच्या सहाय्याने केळघर घाटातील दरड हटविताना
केळघर : प्रतिनिधी - ( टिम दिव्यदृष्टी नामा न्यूज ) - महाबळेश्वर - मेढा - सातारा - धामणेर या राज्यमार्गावरील केळघर घाटातील काळाकडा येथे काल ( सोमवार ) सायंकाळी पडलेली दरड हटविण्यास व त्यामध्ये अडकलेला जेसीबी बाहेर काढण्यास प्रशासनाला आज (मंगळवार ) दुपारी १२ : ३० वाजता यश आले असले तरी यापरिसरात अद्याप भूस्खलन होण्याचा धोका आहे . त्यामुळे बांधकाम विभागाने हा रस्ता सर्वप्रकारच्या वाहतुकीसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे . वाहनचालकांनी मेढा - मालदेव मंदिर - मार्ली - भिलार - मार्गे महाबळेश्वर तसेच मेढा - कुसुंबी - सह्याद्री नगर - मोळेश्वर - माचुतर या मार्गाचा अवलंब करावा असे आवाहन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने करण्यात आले आहे .
गेल्या आठवडाभरापासून जावली तालुक्यात संवतधार पाऊस सुरु असून अनेक ठिकाणी दरडी कोसळणे सुरू आहे . बांधकाम विभागाच्यावतीने तातडीने यंत्रणा राबवून रस्ता मोकळा केला जात आहे . मात्र या संपूर्ण घाटात काळाकडा ते माचुतर या तीन किमी परिसरातील वनविभागाच्या हद्दीतील हा रस्ता अरुंद आहे . याठिकाणी सुरुवातीला कड्याच्या बाजूकडील पडलेली छोटी दरड जेसीबीच्या सहाय्याने हटवताना जेसीबीवर व रस्त्यावर आल्याने रस्ता पूर्णतः बंद झाला त्यामध्ये जेसीबी दरीच्या बाजूला घसरत जाऊन अडकून पडला . प्रशासनाने तातडीने दुसरा जेसीबी व एका क्रेनच्या सहाय्याने अडकलेला जेसीबी व दरड हटविण्यासाठी रात्री एक वाजेपर्यंत पर्यंत केले . तर दुसऱ्या दिवशी आणखी यंत्रसामुग्री मागवत पहाटे पासून दरड हटविण्यासाठी प्रयत्न सुरू केले . मंगळवार दुपारी १२ : ३० वाजता पूर्ण दरड हटवून अडकलेला जेसीबी बाहेर काढून रस्ता मोकळा केला असला तरी बांधकाम विभागाने या रस्त्याची स्थळ पाहणी केली असता सध्या पाऊस सुरू असून त्यामुळे रस्त्यावर दरडी कोसळण्याचा संभव आहे . त्यामुळे काही काळासाठी हा रस्ता सर्वप्रकारच्या वाहतूकीसाठी २८ जुलै पासून बंद ठेवण्यात येत आहे असे पत्र सार्वजनिक बांधकाम विभागाने जावली व महाबळेश्वर तहसिलदार तथा आपत्ती व्यवस्थापन विभागाला दिले आहे .
दरम्यान महाबळेश्वर - मेढा -सातारा - धामणेर या राज्यमार्गावर जवळपास चारशे कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला असून संपूर्ण रस्ता रुंद व चांगला झाला आहे . मात्र केळघर घाटातील या काळाकडा ते माचुतर या तीन किमी रस्त्याचे रुंदीकरण वनविभागाच्या आठमुड्या धोरणामुळे रखडले आहे . आणि याच ठिकाणी वारंवार भूस्खलनाचा धोका वाढत आहे . बांधकाम व वनविभागाने समन्वयाने या रस्त्याचे रुंदीकरण , संरक्षक कठडे करून वाहतुक सुरक्षित करावी तसेच या घाट रस्त्याला पर्यायी म्हणून केळघर ते मोळेश्वर - माचुतर हा जुना शिवकालीन रस्त्याचे सर्वेक्षण करून बांधकाम विभागाने हा रस्ता वापरात आणावा . असे स्थानिकांनी सांगितले .


