मेढा : दस्त प्रक्रिया पूर्ण करताना उपस्थित गटविकास अधिकारी डॉ.निलेश पाटील, निबंधक व कातकरी समाज
कुडाळ ग्रामपंचायतीकडून कातकरी बांधवांसाठी १२ गुंठे जमीन खरेदी
25 कातकरी समाजाच्या लाभार्थ्यांना मिळणार घरकुलाचा लाभ
कुडाळ : प्रतिनिधी - ( टिम दिव्यदृष्टी नामा न्यूज ) -
कुडाळ ता.जावळी येथील कातकरी समाजासह इतर समाजातील सुमारे २५ लाभार्थ्यांना घरकुलासाठी १२ गुंठे जमीन जावली पंचायत समितीचे सभापती सौरभ (बाबा) शिंदे यांच्या पुढाकारातून उपलब्ध करुन देण्यात आली आहे.केंद्र व राज्य शासनाच्या घरकुल योजनेचा लाभ तळागाळातील प्रत्येक लाभार्थ्याला मिळावा या उद्देशाने कातकरी समाजासाठी ही जमीन खरेदी केली असून याचा नुकताच खरेदी दस्त करण्यात आला आहे.गेली कित्येक तरी वर्षे कायमस्वरूपी निवाऱ्यापासून वंचित राहिलेल्या कुडाळमधील कातकरी समाजातील बांधवाना आता हक्काचे घरकुल मिळणार आहे. यामुळे या कुटुंबांच्या निवाऱ्याचे स्वप्न साकार होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
वर्षानुवर्षे जागा मिळेल तिथे आपला संसार थाटणाऱ्या गरीब कष्टकरत जीवन जगणाऱ्या कातकरी समाजाच्या विकासासाठी सर्वांनी पुढाकार घेतला आहे. समाजातील दुर्लक्षित राहिलेल्या या घटकाला त्यांचा हक्काचा निवारा मिळावा म्हणून शासनाच्या पंडित दीनदयाळ उपाध्याय जमीन खरेदी अर्थसहाय योजनेंतर्गत ही जमीन खरेदी करण्यात आली आहे.भूमिहीन कातकरी बांधवांना हक्काची जागा मिळवून देण्याचा शासनाचा हा महत्त्वाकांक्षी उपक्रम प्रत्यक्षात उतरला असून प्रत्येक लाभार्थ्यास शासकीय नियमानुसार अनुदान देण्यात येणार आहे.यातून त्यांचे स्वतःच्या घराचे स्वप्न साकार होत असून या कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या उपक्रमासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांचे मार्गदर्शन लाभले आहे.तसेच प्रकल्प संचालक विश्वास सिद,उपविभागीय अधिकारी आशिष बारकुल,तहसीलदार प्रवीण मुदगुल,गटविकास अधिकारी डॉ.निलेश पाटील,नायब तहसीलदार सुनील मुनाळे,विस्तार अधिकारी डी.एल.सुरवसे,कुडाळ गावच्या सरपंच तथा प्रशासक सुरेखा कुंभार,उपसरपंच सोमनाथ कदम,माजी सरपंच वीरेंद्र शिंदे,ग्रामपंचायत अधिकारी उमेश जाधव,मंडल अधिकारी श्रीमती आर.बी.कोळी,तलाठी दत्तात्रय प्रभाळे,तसेच ग्रामपंचायत सदस्य,घरकुल साठी जागा देणारे सुभाष जगन्नाथ कुंभार यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे जमीन खरेदी व शासकीय प्रक्रिया सुरळीत पार पडली. या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून कातकरी समाजाच्या सामाजिक व आर्थिक उन्नतीसाठी हा एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार आहे. तसेच दुर्लक्षित राहिलेल्या कातकरी समाजातील लोकांना आता शासनाच्या वेळोवेळी जाहीर होणाऱ्या योजनांचा लाभ मिळणार आहे.

