मेढा - प्रशिक्षण केंद्रात प्रगणकांना मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी संतोष पाटील व इतर
जनगणना प्रगणकांना नागरिकांनी अचूक माहिती द्यावी : जिल्हाधिकारी
जावली तालुक्यातील मेढा येथील जनगणना प्रशिक्षण केंद्रास जिल्हाधिकारी संतोष पाटील यांची भेट
केळघर : प्रतिनिधी - (टिम दिव्यदृष्टी नामा न्यूज ) -
देशाच्या संसाधनांचा नियोजनामध्ये व विकास प्रक्रियेमध्ये जनगणनेचे अनन्यसाधारण महत्त्व असून हे महत्त्वाचे राष्ट्रीय काम करण्याची संधी तुम्हाला मिळत आहे हे जनगणनेचे कामकाज कर्मचाऱ्यांनी प्रामाणिकपणे व सचोटीने करावे आणि येणाऱ्या काळात जनगणना प्रगणक आपल्या घरी आल्यानंतर सर्व नागरिकांनी त्याला अचूक माहिती सांगावी तुम्ही ही दिलेली माहिती पूर्णतः गोपनीय ठेवली जाणार असून त्याचा उपयोग विकास योजना व धोरणे ठरवताना शासनाला होणार आहे. या सर्व जनगणना प्रक्रियेकडे कर्मचारी तसेच नागरिक यांनी राष्ट्रीय कर्तव्य समजून निःसंशयपने अचूक माहिती देऊन राष्ट्रकार्यास सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी केले .
जावली तालुक्यातील जनगणना प्रगणक व पर्यवेक्षकांचे तीन दिवसीय प्रशिक्षण आजपासून सुरू झाले या प्रशिक्षणाच्या पहिल्याच दिवशी जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी भेट दिली. या क्षेत्रभेटीमध्ये जिल्हाधिकारी पाटील यांनी प्रशिक्षण सत्रात बसून सत्राची गुणवत्ता पाहणी केली व सर्व प्रगणक, पर्यवेक्षक यांच्याशी संवाद साधला. यावेळी उपविभागीय अधिकारी आशिष बारकुल, तहसीलदार प्रवीण मुदगुल, नायब तहसीलदार सुनील मुनाळे, निसार शेख, मेढा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अजिंक्य पाटील, पंचायत समितीचे विस्तार अधिकारी सौरभ ठुबे, भरत पवार, महसूल विभागाचे अधिकारी, कर्मचारी व तज्ञ प्रशिक्षक, प्रगणक, पर्यवेक्षक उपस्थित होते.
याबाबत अधिक माहिती सांगताना तहसीलदार प्रवीण मुद्गुल म्हणाले जगातील सर्वात प्रतिष्ठित, सर्वात मोठ्या प्रशासकीय आणि सांख्यिकीय उपक्रम जनगणना २०२७ आहे. भारतामध्ये जनगणना १८७२ पासून केली जात आहे .येणारी जनगणना ही देशातील १६ वी जनगणना आहे. राष्ट्राच्या नियोजन आणि विकासासाठी आवश्यक असलेली माहिती या जनगणनेत संकलित केली जाते. ही जनगणना दोन टप्प्यात होणार असून पहिल्या टप्यात घर यादी व घरगणना होणार आहे. जनगणनेच्या दुसऱ्या टप्प्यात प्रत्यक्षात लोकसंख्या गणना होणार आहे. येणाऱ्या १६ मे २०२६ पासून १४ जून २०२६ पर्यंत तीस दिवसात पहिल्या टप्प्यातील घरगणनेची प्रक्रिया राबवली जाणार आहे. प्रत्यक्ष लोकसंख्या गणना फेब्रुवारी २०२७ मध्ये होणार आहे. या प्रक्रियेसाठी प्रगणक आणि पर्यवेक्षक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यंदाच्या जनगणनेचे वैशिष्ट्य म्हणजे ही पूर्णतः डिजिटल असून मोबाईल अॅप द्वारे माहिती संकलित केली जाईल. तसेच सर्व नागरिकांना १ मे ते १५ मे २०२६ या कालावधीत स्वगणना ही करता येईल. जावली तालुक्यात एकूण २४६ घर यादी गट तयार करण्यात आले असून एकूण २३७ प्रगणकांची, ४५ पर्यवेक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. याच सोबत ४ फील्ड ट्रेनर्स ही नियुक्ती करण्यात आले आहेत.

