जावली तालुक्यात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान अभियान शिबिराचे आयोजन
केळघर : प्रतिनिधी - ( टिम दिव्यदृष्टी नामा न्यूज ) - महाराष्ट्र शासन यांच्या महसूल व वन विभागाच्या निर्देशानुसार जावली तालुक्यात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान (टप्पा क्र. १) राबविण्यात येत असल्याची माहिती तहसिलदार प्रविण मुदगुल यांनी दिली.
या अभियानाचा उद्देश महसूल विभागाशी संबंधित सेवा अधिक सुलभ, जलद व लोकाभिमुख करणे हा आहे.या शिबिरांमधून फेरफार नोंदी काढणे, अभिलेख दुरुस्ती, लोकसेवा हक्क अधिनियमान्वये प्रकरणांचा निपटारा, अतिक्रमण व अतिक्रमण परवानगी संबंधी प्रकरणे, तसेच ई-नोंदणी, पी एम किसान योजनेसह विविध शासकीय योजनांचा लाभ नागरिकांना देण्यात येणार आहे. नागरिकांना जास्तीत जास्त लाभ मिळावा, यासाठी मार्गदर्शनही केले जाणार आहे.
ग्रामीण भागातील शेतकरी, महिला, विद्यार्थी व सर्वसामान्य नागरिकांना या सेवांचा थेट लाभ मिळावा, यासाठी जावली तालुक्यातील प्रत्येक महसुली मंडळात ठरावीक तारखांना शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत. या शिबिरांमध्ये वारस नोंदी, नाव दुरुस्ती, अनावश्यक अर्ज कमी करणे, बोजा नोंदी कमी करणे, तसेच तगाई व इतर महसूल विषयक प्रकरणांचा तातडीने निपटारा केला जाणार आहे.
शिबिरांचे वेळापत्रक मंडल निहाय पुढीलप्रमाणे आहे :
केळघर मंडल : ७ मार्च भैरवनाथ मंदिर, हॉल केळघर, बामणोली मंडल - १४ मार्च भैरवनाथ मंदिर, ग्रामपंचायत कार्यालय, आनेवाडी मंडल - १० एप्रिल ग्रामपंचायत कार्यालय, हॉल सायगाव, कुडाळ मंडल : १७ एप्रिल ग्रामपंचायत कार्यालय हॉल , मेढा मंडल : ८ मे तहसील कार्यालय, जावली (मेढा), करहर मंडल : १५ मे विठ्ठल-रुक्मिणी मंदिर सभागृह, करहर येथे आयोजन करण्यात आले आहे . या शिबिरांचा लाभ घेण्यासाठी पात्र नागरिकांनी आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावे, असे आवाहन जावली तालुका तहसीलदार प्रवीण मुदगुल यांनी केले आहे.

