भाजपाचे हे सरकार भांडवलदारांचे आहे सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता मिळवत लोकांवर दबाव टाकून निवडणुका जिंकल्या जात आहेत - शशिकांत शिंदे

0

 

भाजपाचे हे सरकार भांडवलदारांचे आहे सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता मिळवत लोकांवर दबाव टाकून निवडणुका जिंकल्या जात आहेत - शशिकांत शिंदे


केळघर : प्रतिनिधी -(टिम दिव्यदृष्टी नामा न्यूज ) - 

भाजपाचे हे सरकार भांडवलदारांचे आहे सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता मिळवत लोकांवर दबाव टाकून निवडणुका जिंकल्या जात आहेत. माथाडी कायदा मोडीत काढण्याचे काम भाजपा करत आहे . आता भुलथापांना लोक  बळी पडणार नाहीत . लोकांमध्ये नाराजी आहे ही बाजूची काही बडवी आहेत त्यांचा बंदोबस्त करण्याची वेळ आली आहे . आपले उमेदवार जावलीच्या स्वाभिमानासाठी उभे आहेत. त्यांना निवडून देऊन आपला इतिहास आपणच रचण्यासाठी सज्ज व्हावा .असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी केले .

      केळघर येथे शिवसेना , राष्ट्रवादीचे कुसुंबी जि प गटाचे उमेदवार कविता ओंबळे , पंचायत समिती गणाचे उमेदवार सुनीता दुंदळे , आंबेघर तर्फ मेढा पंचायत समिती  गणाचे उमेदवार आतिश कदम यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या सभेत ते बोलत होते . यावेळी माजी सभापती बापूराव पार्टे , प्रतापगड साखर कारखान्याचे संचालक आनंदराव जुनघरे , शिवसेनेचे तालुकाध्यक्ष शांताराम कदम, संतोष चव्हाण , राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष साधू चिकणे , अभिजित पार्टे , नगरसेवक बापू जवळ, चंद्रकांत धनावडे , विठ्ठल पवार , वैभव ओंबळे ,नारायणराव शिंगटे , बाळासाहेब शिर्के , विलास दुंदळे , शंकर वेंदे , संतोष कदम,उषा उंबरकर आदिंची प्रमुख उपस्थिती होती .

     यावेळी शशिकांत शिंदे पुढे म्हणाले,आपल्या हक्काचे पाणी मिळवण्यासाठी स्वर्गीय विजयराव मोकाशी यांचे स्वप्न साकार करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने एल्गार देण्याची आवश्यकता आहे . येत्या पावसाळ्यापर्यंत बोंडारवाडी धरणाचा प्रश्न निकाली निघाला नाही तर एक थेंबही पाण्याचा खाली जाऊ द्यायचा नाही . असा प्रत्येकाने निर्धार करा आपल्या हक्काचे पाणी आपल्याला मिळालेच पाहिजे . आपला देश कृषी प्रधान असूनही येथे कृषी उत्पादनासाठी करार केला जातो हे शेतकऱ्यांसाठी दुर्दैवी आहे .सध्या सर्वत्र हुकूमशाही चालू असून सत्तेसाठी काहीही ऑफर दिल्या जातात . त्यामुळे उमेदवारांसह मतदारांनी जागरूक राहण्याची आवश्यकता आहे .  जावलीतील जनता सुज्ञ असून कोणत्याही भूलथापांना बळी पडणार नाही .


यावेळी माजी सभापती बापूराव पार्टे म्हणाले , विकास कामांचा डांगोरा फिटला जात आहे मात्र प्रत्यक्षात जावली तालुक्यातील मुख्यालयाच्या ठिकाणी झालेली विकास कामे शशिकांत शिंदे यांच्या काळात झालेली आहेत .आता विकास केवळ ठेकेदार पोसण्यासाठी निधी उपलब्ध केला जात असून  निकृष्ट दर्जाची कामे करून पैसा मिळवला जात आहे . अनेक रस्त्यांना लगेच खड्डे पडत आहेत . पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा कमवून लोकांना दमदाटी दिली जात आहे .मात्र  मतदार सुज्ञ आहेत त्यांना माहित आहे .  केवळ समाजसेवा करणाऱ्या व्यक्तीला निवडून द्यायचे आहे .पैशाच्या पाठीमागे न लागता प्रामाणिकपणे काम करणाऱ्या उमेदवारांच्या पाठीशी जनतेने खंबीरपणे राहावे .

     यावेळी अंकुश बाबा कदम म्हणाले ,विकासाच्या गप्पा मारणाऱ्यांनी  केवळ ठेकेदारांचाच विकास केला आहे  जे आता धरणाच्या गप्पा मारत आहेत . त्यांनीच स्व विजयराव मोकाशी यांनी बोंडारवाडी धरणासाठी काढलेल्या मोर्च्याला विरोध केला होता . ठेकेदारी करताना यांनी आपल्या मातीलाही सोडले नाही ते निसर्गाला ओरबडण्याचे काम करत आहेत .जावलीचा स्वाभिमान जागा ठेवण्यासाठी धनुष्यबाणाला मतदान करा .



    यावेळी  एकनाथ ओंबळे म्हणाले , नवीन समिती निर्माण करून बोंडारवाडी धरणामध्ये कोणी अडथळा आणला हे सर्वज्ञात आहे . आज विकास कामांच्या गप्पा मारणाऱ्यांनो बघा तीन तीन महिन्यात अनेक रस्त्यांना खड्डे पडले आहेत . ही ह्यांच्या निकृष्ट कामांची पोच पावती आहे .आज लोकांच्या शेतामध्ये ,अन्नामध्ये तुम्ही माती कालवत आहात . जनता तुम्हाला आता कंटाळली आहे . लोकांना ठेकेदारीतून कमावलेल्या पैशांची अमिषे दाखवली जात आहेत . परंतु आता सुज्ञ मतदार कोणत्याही भूलथापांना , अमिषाला बळी पडणार नाही हे विरोधकांनी लक्षात ठेवावे . बाबाराजेंच्या आडून तुम्ही लोकांना धमकावत आहात , बाबाराजेंसाठी महायुतीतून आम्हीही प्रामाणिक काम केले आहे . येथील बी एम पार्टे पतसंस्था कोणी बुडवली हे लोकांना माहित आहे.त्यामुळे जनतेमध्ये प्रचंड उद्रेक आहे . यावेळी आतिश कदम , उषा उंबरकर , बाळासाहेब ओंबळे , राजाराम जाधव आदिची भाषणे झाली . शिवसेना , राष्ट्रवादीच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले .

     यावेळी कुसूंबी गटातील विविध संस्थांचे पदाधिकारी , शिवसेना , राष्ट्रवादीचे पदाधिकारी , कार्यकर्ते , युवक उपस्थित होते .

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)