विरोधकांकडे जावळीच्या जनतेबाबत पुतना मावशीचे प्रेम ; जावळी तालुक्याचा सर्वांगीण विकास भाजपच्या माध्यमातून सुरू आहे -मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

0

 

विरोधकांकडे जावळीच्या जनतेबाबत पुतना मावशीचे प्रेम ; जावळी तालुक्याचा सर्वांगीण विकास भाजपच्या माध्यमातून सुरू आहे -मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले


केळघर : प्रतिनिधी - (टीम दिव्यदृष्टी नामा न्यूज ) - 

निवडणुका आल्या की जावळी तालुक्यातील विरोधक तालुक्यात येऊन मोठमोठ्या गप्पा मारतात. निवडणुका झाल्या की परत मुंबईचा रस्ता धरतात. विरोधकांकडे जावळीच्या जनतेबाबत पुतना मावशीचे प्रेम असून जावळी तालुक्याचा सर्वांगीण विकास भाजपच्या माध्यमातून सुरू आहे.याची माहिती तालुक्यातील जनतेला असून या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत विरोधकांना हद्दपार करून भाजपच्या सर्व उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करा असे आवाहन सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले. 

          आज केळघर येथे  जिल्हा परिषदेच्या कुसुंबी गटाच्या भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवार  सौ. अर्चनाताई ज्ञानदेव रांजणे, कुसुंबी पंचायत समिती गणाच्या अधिकृत उमेदवार सौ. पुष्पा जगन्नाथ चिकणे तसेच आंबेघर पंचायत समिती गणाचे अधिकृत उमेदवार  विजय बाबाजी सपकाळ यांच्या प्रचारार्थ  आयोजित कोपरा सभेत मंत्री भोसले बोलत होते.   यावेळी माजी आमदार सदाभाऊ सपकाळ,जिल्हा बँकेचे संचालक  ज्ञानदेव रांजणे, मेढ्याचे उपनगराध्यक्ष विकास देशपांडे,विजय शेलार, तुकाराम धनावडे, हणमंतराव शिंगटे, बबन बेलोशे हरिभाऊ शेलार, पांडुरंग जवळ, दत्ता पवार, सागर धनावडे, एकनाथ पवार, रामभाऊ शेलार, मोहनराव  कासुर्डे, विठ्लराव देशमुख , आनंदराव सपकाळ , बबन जुनघरे, चंद्रकांत वेंदे, संदीप शेलार,नाना जांभळे, निर्मला दुधाणे,कविता धनावडे, निर्मला कासुर्डे ,ज्ञानेश्वर दळवी, अंकुश बेलोशे, यांच्यासह विविध गावातील मान्यवर आणि ग्रामस्थ मोठ्या  संख्येने उपस्थित होते.

    यावेळी मंत्री भोसले म्हणाले, बोंडारवाडी धरण केवळ  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच पूर्ण करणार आहेत. विरोधकांनी या प्रकल्पासाठी काय पाठपुरावा केला याची माहिती द्यावी. एकही विकासकाम तालुक्यात करायचे नाही अन आम्ही केलेल्या विकासकामाबाबत बोलायचे हा आधिकार विरोधकांना नाही. मी जो शब्द देतो तो शंभर टक्के पाळतो याची जाणीव तालुक्यातील जनतेला आहे त्यामुळे सलग चार वेळा मी या मतदारसंघातुन निवडून आलो आहे. मी मंत्री केवळ सातारा जावळी तालुक्यातील जनतेमुळेच आहे. कुसुंबी -कोळघर रस्ता पूर्ण केला असून जावळी तालुक्यातून कोकणाला जोडणाऱ्या रस्त्याचे कामही सुरू आहे. जावळी व महाबळेश्वर तालुक्यांना जोडणारा वाहिटे ते माचुतर रस्त्याचे काम मार्गी लावणार असून डांगरेघर ते धावली याही रस्त्याचे काम मार्गी लावणार आहे. कुरळोशी-गाढवली-वारणे वस्ती ते राजमार्गाला जोडणाऱ्या रस्त्याचे कामही मार्गी लावणार आहे. आतापर्यंत विकासकामे भाजपच्या माध्यमातून केली असून यापुढेही विकासकामे भाजपच करणार असल्याने तालुक्यातील सर्व भाजपचे उमेदवार या निवडणुकीत निवडून येणार असून विजयाचा गुलाल भाजपचे कार्यकर्ते उधळणार आहेत.


जिल्हा बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे यांनी मंत्री शिवेंद्रसिंहराजे यांचे हात बळकट करण्यासाठी भाजपच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले.

सागर धनावडे यांनी विरोधकांवर टीकास्त्र सोडताना सांगितले की  निवडणूक आहे विकासकामांवर बोला वैयक्तीक व्यवसायांवर कोणीही जाणूनबुजून टीका केली तर विरोधकांचे काळे धंदे जनतेसमोर आणले जातील.

प्रारंभी सावली ते केळघर पर्यंत मंत्री शिवेंद्रसिंहराजे यांच्या उपस्थितीत युवकाची दुचाकीवरून रॅली काढण्यात आली. या रॅलीस युवकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)