भुतेघर येथील शिवानी सुरेश मानकुंबरे हिची भारतीय हवाई दलात निवड
केळघर : प्रतिनिधी - ( टिम दिव्यदृष्टी नामा न्यूज ) - भुतेघर ता. जावळी येथील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील शिवानी सुरेश मानकुंबरे हिची भारतीय हवाई दलात निवड झाली असून तिने राज्यातून सहावी रँक मिळवून हे दैदिप्यमान यश मिळवले आहे.दुर्गम छोट्याशा भुतेघर गावांतील शिवानी ने अथक व कठोर परिश्रमातून आकाशाला गवसणी घालण्याची स्वप्नवत कामगिरी केली असून शिवानी ही भारतीय हवाई दलात निवड होणारी जावळी तालुक्यातील पहिलीच कन्या आहे. शिवानीचे वडील महाबळेश्वर येथे खासगी नोकरी करतात.तर आई शेतात काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करते. लहानपणापासून गरिबीचे चटके सहन केलेल्या शिवानी ने जिद्दीतून यश मिळवले आहे. लहानपणापासून शिवानी ही अभ्यासात हुशार , जिद्दी , होती.शिवानीचे प्राथमिक शिक्षण दुर्गम अशा भुतेघर गावात झाले. पाचवी ते दहावी पर्यंतचे शिक्षण केळघर येथे झाले. तर अकरावी व बारावीचे शिक्षण मेढा येथील आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालयात झाले आहे. सध्या ती साताऱ्यातील लाल बहादूर शास्त्री महाविद्यालयात दुसऱ्या वर्गात शिकत आहे. शिवानीला पाठखळ माथा येथील मराठा कमांडो अकादमीचे प्रशिक्षक योगेश कदम व राहुल कदम यांनी व चुलते सुनील यांनी मार्गदर्शन केले.
शिवानीच्या वडिलांची शेती फक्त अठरा गुंठे असून वडिलोपार्जित दगड मातीचे जुने कौलारू घर असून शेतकरी कुटुंब असून छत्रीवाल्यांच घर म्हणून शिवणीच्या कुटुंबाची गावात ओळख आहे.
आमची शिवानी एक दिवस आकाशाला गवसणी घालणारी कामगिरी पार करेल , असे स्वप्नातही वाटले नव्हते. असे तिचे चुलते सुनील मानकुंबरे यांनी सांगितले.चुलते सुनील यांनी शिवाणीला वेळोवेळी योग्य ते मार्गदर्शन करून तिला हिंमत वाढवण्यास सतत कार्यरत राहिले.
तिच्या मागे ठामपणे उभं राहून तिचा आत्मविश्वास वेळोवेळी वाढवला.
शिवानीने आपल्या कुशाग्र बुद्धीने एक एक टप्पा पार करत , रात्रंदिवस मेहनत करून , येणाऱ्या संकटांचा सामना करून मला जे लक्ष्य मिळवायचे आहे ते मी मिळवणार हेच ध्येय समोर ठेवल्याने तिची भारतीय हवाई दलात मध्ये निवड होऊन ती अख्या महाराष्ट्रात सहावी रँक मिळवून आपल्या आईवडिलांच्या कष्टाचे चीज करून दाखवले आहे.
सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील केळघर विभागातील छोटेशे गाव भुतेघर येथील शिवानी ने मिळवलेल्या या यशामुळे गावाचेच नव्हे तर पंचक्रोशीतील शेतकऱ्यांच्या, जावळी तालुक्यातील सर्वसामान्य कुटुंबातील मुलींच्या माना उंचावल्या आहेत.
-सुनील मानकुंबरे (शिवानीचे चुलते)
घरची परिस्थिती अत्यंत बिकट असताना आई वडिलांनी मोठ्या कष्टातून चांगले शिक्षण दिले. ग्रामीण भागातील मुली मोठे यश मिळवत नाहीत हा गैरसमज दूर करून शाश्वत व कुटुंबाला अभिमान वाटेल असे यश मिळवण्याचा निर्धार केला होता. कुटूंबीय, प्रशिक्षक,नातेवाईक यांच्या सहकार्यामुळे भारतीय हवाई दलाच्या सेवेत काम करण्याची संधी मिळाली असून या संधीचे सोने करण्यासाठी काम करणार आहे.
- शिवानी मानकुंबरे

