जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत जल्लोषात पार पडला आजी-माजी शिक्षक, विद्यार्थी, सरपंच व समाजरत्नांचा कृतज्ञता सन्मान सोहळा
केळघर : प्रतिनिधी - ( टिम दिव्यदृष्टी नामा न्यूज )-
म्हाते खुर्द, ता. जावली येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा म्हाते खुर्द येथे गावाच्या विकासात मोलाचे योगदान देणाऱ्या विविध समाजशील घटकांचा भव्य कृतज्ञता सन्मान सोहळा उत्साहात संपन्न झाला.
गावातील "ज्ञानज्योती" प्रज्ज्वलित करणाऱ्या स्थापनेपासून आजपर्यंतच्या सर्व शिक्षकांचा मानपत्र देऊन विशेष गौरव करण्यात आला. शाळेची घडण, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास आणि शैक्षणिक उन्नतीसाठी दिलेल्या योगदानाची ग्रामस्थांनी कृतज्ञतेने दखल घेतली.
ग्रामपंचायत कारभार बळकट करण्यासाठी योगदान देणाऱ्या आजी-माजी सरपंचांना शाल-पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच तालुक्यातील पत्रकार, कर्तृत्ववान शेतकरी, विधवा महिला, माजी विद्यार्थी, नवयुग मंडळ अध्यक्ष, नेहरू युवा मंडळ,नवयुग पतसंस्थेचे अध्यक्ष आदी समाजसेवी व्यक्तिमत्त्वांचा विशेष सत्कार करून त्यांच्या कार्याबद्दल गावकऱ्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
कार्यक्रमाला गावातील नागरिक, ज्येष्ठ नागरिक, महिला, युवा तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामसभेतील एकात्मता, परस्पर सन्मान आणि समाजाच्या सर्व घटकांना जोडणारा हा उपक्रम सर्वांच्याच कौतुकास पात्र ठरला असल्याची भावना म्हाते गावचे सुपुत्र पत्रकार विकास दळवी यांनी बोलून दाखवली.या कार्यक्रमास सहाय्यक बीडीओ राम जगताप, विस्तार अधिकारी गोविंद माने यांनी मार्गदर्शन केले. कर संकलन, अँप डाऊनलोड करणे, अवयव दान फार्म भरणे, अँग्री स्टँक काढणे ही कामे अभियानाच्या माध्यमातून पुर्णत्वास केल्याची माहिती सरपंच राजाराम दळवी यांनी दिली.

