स्वच्छ सुंदर,स्मार्ट व निर्मल ग्राम तळोशीच्या ग्रामस्थांच्या सतर्कतेने वाचले दुर्मिळ खवले मांजराचे प्राण

0

 


स्वच्छ सुंदर,स्मार्ट व निर्मल ग्राम तळोशीच्या ग्रामस्थांच्या सतर्कतेने वाचले दुर्मिळ खवले मांजराचे प्राण


केळघर : प्रतिनिधी - ( टिम दिव्यदृष्टी नामा न्यूज ) -

जावली तालुक्यातील तळोशी गावाने पुन्हा एकदा माणुसकी व प्राणीप्रेम यांचे जिवंत उदाहरण घालून दिले आहे. गावातील पाण्याच्या टाकीत दुर्मिळ जातीचे खवले मांजर (Pangolin) पडले असल्याचे ग्रामस्थांच्या निदर्शनास आले. विशेष म्हणजे हे मांजर जखमी अवस्थेत असल्याने ग्रामस्थांनी दाखवलेली तत्परता त्याच्या जीवासाठी वरदान ठरली.


स्मार्ट व निर्मल ग्राम तळोशी येथे आज सकाळी ग्रामस्थांना पाण्याच्या टाकीत काही हालचाल दिसली. बारकाईने पाहिल्यावर खवले मांजर पडल्याचे लक्षात आले. सरपंच वनिता बैलकर ग्रामस्थ सदस्य बाजीराव बैलकर, सदाशिव चिकणे, अक्षय चिकणे, सचिन बैलकर, पोलिस पाटील संतोष चिकणे, ग्रामसेविका- अपर्णा जाधव मॅडम,माजी उपसरपंच बाबुराव चिकणे, विपुल बैलकर, शुभम चिकणे, राजाराम चिकणे यांनी एकत्र येऊन मोठ्या मेहनतीने त्या प्राण्याला सुरक्षितपणे बाहेर काढले. ग्रामस्थांनी तत्काळ वन विभागाशी संपर्क साधला आणि प्राण्याचे प्राण वाचवण्यासाठी मदत मागितली.


उपवनसंरक्षक अमोल सातपुते, सहा. वनसंरक्षक प्रदीप रौंदळ यांच्या मार्गदर्शनाखाली वन परिक्षेत्र अधिकारी मेढा संदीप झोपळे, धनपाल मारुती माने (वनरक्षक केळघर), अति. कार्यवाहक आकाश कोळी, तसेच वनसंरक्षक मेढा स्वप्नील चौगुले यांनी या बचाव मोहिमेत विशेष सहकार्य केले. जखमी खवले मांजराला तातडीने वैद्यकीय मदत देण्यासाठी पशुवैद्यकीय अधिकारी सौ. रोहिणी जाधव पवार यांनी प्रथमोपचार करून त्याला जिवदान दिले.


गावकऱ्यांनी दाखवलेले हे सामूहिक योगदान संपूर्ण जावली तालुक्यात चर्चेचा विषय ठरत आहे. "तळोशी हे गाव फक्त स्वच्छतेसाठीच नव्हे तर माणुसकी आणि प्राणीप्रेमासाठीही ओळखले जाते," असे मत ग्रामस्थांनी व्यक्त केले. या घटनेतून गावाने पुन्हा एकदा सिद्ध केले की, संकटात सापडलेल्या प्राण्यांच्या जीवाची काळजी घेणे ही आपली माणुसकीची जबाबदारी आहे.


विशेष म्हणजे तळोशी या गावात सन 2000 सालापासून कधीही वनवा लावलेला नाही. यावरून ग्रामस्थांची निसर्गप्रेमी वृत्ती स्पष्ट होते. या घटनेनंतर तळोशी गावचे संपूर्ण तालुक्यात कौतुक होत असून, ग्रामस्थांचा हा आदर्श इतर गावांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.


खवले मांजर ही वन्यजीव संरक्षण अधिनियमांतर्गत संरक्षित प्रजाती असल्याने त्याचे अस्तित्व टिकवून ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. या प्राण्याचे रक्षण करण्यासाठी ग्रामस्थ, वनविभाग व वैद्यकीय अधिकारी यांनी दाखवलेली संवेदनशीलता व सहकार्य निश्चितच कौतुकास्पद आहे.


तळोशी गावातील या घटनेने पुन्हा एकदा दाखवून दिले की, एकतेने आणि जबाबदारीने काम केले तर माणसाचे आणि निसर्गाचे नाते अधिक दृढ होऊ शकते. तळोशीचे हे योगदान जावली तालुक्यासाठी अभिमानाचा विषय ठरले आहे.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)