केळघर -कै. विजयराव मोकाशी यांच्या स्मृतिदिनामित्त आयोजित शेतकरी मेळाव्यात मार्गदर्शन करताना शिवेंद्रसिंहराजे भोसले. समवेत भारत पाटणकर, सदाशिव सपकाळ,ज्ञानदेव रांजणे, एकनाथ ओंबळे, राजेंद्र मोकाशी आदी
राज्य सरकारच्या माध्यमातून बोंडारवाडी धरण पूर्ण करणे, हीच कै. विजयराव मोकाशी यांना खरी श्रद्धांजली- ना शिवेंद्रसिंहराजे भोसले
केळघर : प्रतिनिधी - ( टिम दिव्यदृष्टी नामा न्यूज) - बोंडारवाडी धरण हे जावळी तालुक्यातील ५४ गावांसाठी महत्वाचा प्रकल्प आहे. हे धरण पूर्ण होण्यासाठी कै. विजयराव मोकाशी यांनी या धरणासाठी जनआंदोलन उभे केले होते. राज्य सरकारच्या माध्यमातून हे धरण पूर्ण करणे हीच कै. विजयराव मोकाशी यांना खरी श्रद्धांजली असणार आहे. जावळी तालुक्यातील जनतेने वेळोवेळी ताकद दिल्याने मी मंत्री झालो असून सर्वांना सोबत घेऊन बोंडारवाडी धरण प्रकल्प होईपर्यंत स्वस्थ बसणार नाही, सरकार या प्रकल्पासाठी सकारात्मक असून बाधित गावांचाही प्रश्न सोडवण्यासाठी बाधित गावे ,व कृती समिती यांची लवकरच बैठक घेऊन या प्रकल्पाचा प्रश्न निकाली लागण्यासाठी काम करणार असल्याची ग्वाही सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली.
बोंडारवाडी धरण कृती समितीचे निमंत्रक कै. विजयराव मोकाशी यांच्या तृतीय स्मृतिदिनामित्त नांदगणे येथील श्री. स्वामी समर्थ मंगल कार्यालयात आयोजित शेतकरी मेळाव्यात मंत्री भोसले बोलत होते. याप्रसंगी श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर, माजी आमदार सदाशिव सपकाळ, जिल्हा बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे, शिवसेना जिल्हा सहसंपर्क प्रमुख एकनाथ ओंबळे, राजेंद्र मोकाशी, दत्तात्रय पवार, मोहनराव कासुर्डे, रामभाऊ शेलार ,अंकुश कदम,आदिनाथ ओंबळे, वैभव ओंबळे ,कुणाल मोकाशी आदींची उपस्थिती होती.
मंत्री भोसले म्हणाले, बोंडारवाडी प्रकल्पाचे खऱ्या अर्थाने जनक हे विजयराव मोकाशी हे होते. सुरुवातीला पिण्याच्या पाण्यासाठी या धरणाला मंजुरी मिळाली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून जलसिंचन विभागाकडून हे धरण पूर्ण करण्याचा निर्णय शासनाने घेतला. हे धरण एक टीएमसी क्षमतेचे असून शासन व प्रशासन या धरणाबाबत सकारात्मक आहे. या प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या ग्रामस्थांचे योग्य त्या ठिकाणी पुनर्वसन होण्यासाठी शासनाच्या मदतीने प्रयत्न करणार आहे. या धरणासाठी निधी कमी पडून दिला जाणार नाही. बाधित ग्रामस्थांशी संवाद साधून योग्य तो तोडगा काढणार असून प्रकल्पाचा प्रश्न मार्गी लागण्यासाठी तुमचा लोकप्रतिनिधी म्हणून काम करणार आहे. या धरणाचे नाव विजयसागर जलाशय ठेवून कै. विजयराव मोकाशी यांचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी मी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही त्यांनी शेवटी दिली .