काटवली : अशा प्रकारे लोंबकळणाऱ्या विद्युत तारा धोकादायक ठरत आहेत
लोंबकळणाऱ्या विद्युत दाबाच्या तारामुळे काटवलीकरांचा जीव टांगणीला ; दुरुस्ती करण्याऐवजी विद्युत वितरणाच्या घर मालकांना नोटिसा
केळघर : प्रतिनिधी - ( टिम दिव्यदृष्टी नामा न्यूज ) -
उच्च दाबाच्या वीज जोडणीचे खांब काटवली ( तालुका जावळी ) गावातील मुख्य नागरी वस्तीतून गेले आहेत. याच्या लोंबकळत असलेल्या धोकादायक जिवंत विद्युत तारा नागरिक व लहान मुलांसाठी त्रासदायक ठरत असल्याने सर्वांचाच जीव टांगणीला लागला आहे. असे असतानाही वीज वितरण कंपनीने यात दुरुस्ती करण्याऐवजी गावातील घराच्या मालकांना नोटीस काढून आपली मर्दुमकी दाखवली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की काटवली गावात उच्च दाबाच्या विद्युत तारा जमिनीपासून हाताला लागतील येवढ्या अंतरावर आल्या आहेत. पूर्वी या लाइन उंचावर होत्या परंतु काही दिवसापूर्वी विद्युत वितरण कंपनीने सडलेले पोल बदलले आहेत. यावेळी या तारा खाली आल्या आहेत. या लोंबकळत असलेल्या तारांमुळे लहान मुले, महिला यांना या ठिकाणी वावरणे मुश्किल झाले असून क्षणोक्षणी धोका संभवत असल्याने सर्वांचाच जीव टांगणीला लागला आहे. या जीवघेण्या विद्युत ताराबाबत संबंधित विभागाकडे तक्रार देऊनही त्यांच्याकडून दुर्लक्ष केल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे.
जावळी तालुक्यात जिवंत विद्युत तारा तुटून पडल्याने जीवितहानी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे काटवली परिसरातील शेतकरी, महिला, मुले भयभीत झाले आहेत. विद्युत वितरण कंपनीच्या ढिसाळ कारभारामुळे जिवंत विद्युत तारा धोकादायकपणे लोंबकळत आहेत. आगोदर या तारा उंचावर होत्या परंतु पोल बदलल्याने त्या धोकादायक स्थितीत आहेत. हे सुधारण्याऐवजी विद्युत वितरणने या तारे शेजारील दहा वर्षापूर्वी बांधलेल्या घराना नोटिसा दिल्याचा अजब प्रकार केला आहे. त्यामुळे नागरिक संतप्त झाले आहेत.
विद्युत वितरण कंपनीकडून काटवली गावात सर्वेक्षण करून लोंबकळत असलेल्या तारांची उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. विद्युत वितरण कंपनीच्या दुर्लक्षामुळे काही जीवितहानीच्या घटना घडल्यास पूर्णपणे विद्युत वितरण जबाबदार राहील
- मीनाक्षी बेलोशे, सरपंच , काटवली
माझे घर मी दहा वर्षापूर्वी बांधले आहे. परंतु आजपर्यंत या तारेचा मला कसलाच धोका नव्हता परंतु आता एक सडलेला पोल बदलल्यानंतर या तारा घरा शेजारी लोंबकळत आहेत. त्या दुरुस्त करण्याऐवजी मलाच घराबाबत नोटीस वीज कंपनीने दिले आहे. हा मुघलकी आदेश आम्ही कदापिही सहन करणार नाही परंतु जर यामुळे काही धोका घडल्यास यास सर्वस्वी वीज वितरण जबाबदार राहील
- विकास बेलोशे, ग्रामस्थ, काटवली.

