प्रा . तुकाराम ओंबळे यांचे शैक्षणिक, सामाजिक आणि पत्रकारिता क्षेत्रातील कार्य प्रेरणादायी - हरीश पाटणे

0

 


प्रा . तुकाराम ओंबळे यांचे शैक्षणिक, सामाजिक आणि पत्रकारिता क्षेत्रातील कार्य प्रेरणादायी - हरीश पाटणे


केळघर : प्रतिनिधी - ( टिम दिव्यदृष्टी नामा न्यूज ) -

प्राध्यापक तुकाराम ओंबळे यांनी शैक्षणिक सामाजिक आणि पत्रकारिता क्षेत्रात केलेले काम मौल्यवान असून ते युवकांसाठी प्रेरणादायक आहे. असे गौरवोद्गार दैनिक पुढारीचे ब्युरो चीफ हरीश पाटणे यांनी मेढा तालुका जावली येथे काढले.

         मेढा येथे प्रा. तुकाराम ओंबळे यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त जावली तालुका पत्रकार मित्र, जनसेवा प्रतिष्ठान केडंबे, ग्रामस्थ मंडळ केडंबे व माजी विद्यार्थी यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित प्रा. तुकाराम ओंबळे सत्कार समारंभ प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी दै. ग्रामोद्धारचे संपादक बापूसाहेब जाधव होते.

    हरीश पाटणे पुढे म्हणाले, "प्रा. ओंबळे यांनी विविध क्षेत्रात केलेले काम मोठे असून समाजाला ते माहीत होणे आवश्यक आहे. प्राध्यापक ओंबळे यांच्या पत्रकारितेतील कार्यामुळे जावली तालुक्यात पत्रकारांची एक नवीन पिढी तयार झाली. त्यांची निस्पृह, रचनात्मक आणि धडाडीची पत्रकारिता आमच्यासाठी अभिमानाची बाब असल्याचे सांगून शेवटी श्री. पाटणे यांनी "आजच्या तरूण पत्रकारांनी प्रा. तुकाराम ओंबळे यांचा आदर्श घ्यावा", असे आवाहन केले.

            यावेळी रयत शिक्षण संस्थेचे माजी इन्स्पेक्टर विजयसिंह पिसाळ, प्राध्यापक श्रीधर साळुंखे, जीवनधर चव्हाण, डॉक्टर रवींद्र भोसले, बापूराव पार्टे, जगन्नाथ शिंदे, ॲड शिवाजीराव मर्ढेकर, आदिनाथ ओंबळे , एकनाथ ओंबळे इत्यादी प्रमुख मान्यवरांनी मनोगत व्यक्त करुन त्यांनी प्रा. तुकाराम ओंबळे यांच्या विविधांगी जीवनकार्याचा गौरव पूर्ण उल्लेख केला.

जनसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष एकनाथ ओंबळे यांनी प्रास्ताविक भाषणात आपले गुरुवर्य ओंबळे सर यांचे कौटुंबिक जीवन व अध्यापन कौशल्य याविषयी माहिती सांगितली. 

         प्रारंभी केक कापून शुभेच्छापर गीताच्या स्वरात व टाळ्यांच्या गजरात ओंबळे सरांचा वाढदिवस संपन्न झाला. यावेळी पाहुण्यांच्या हस्ते शाल श्रीफळ व सन्मानपत्र देऊन त्यांचा ह्रदय सत्कार करण्यात आला.



        सत्काराला उत्तर देताना प्रा. तुकाराम ओंबळे यांनी आपल्या कौटुंबिक जीवनातील तसेच सामाजिक, शैक्षणिक व पत्रकारिता क्षेत्रातील वाटचालीत आलेले बरे वाईट अनुभव सांगितले. तसेच आज अखेर ज्यांचे ज्यांचे सहकार्य लाभले त्या सर्वांचे आभार मानले. या वेळी प्रा. ओंबळे यांचे तर्फे जावली तालुक्यातील सार्वजनिक ग्रंथालयांना प्रत्येकी दोन ग्रंथ भेट देण्यात आले.

        याप्रसंगी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी गुरुवर्य आर. एन. काळे, एड.उत्तमराव गोळे, एड. विवेक देशमुख, एड. बाळासाहेब गायकवाड, प्रा. बी. पी. पवार, प्रा. जे. के. अणि के. ए. नलवडे, आर. डी. पवार, रघुनाथ दिघे, सरपंच महादेव ओंबळे, बंडोपंत ओंबळे, आनंदराव जुनघरे, आनंदराव म्हस्कर, शंकरराव जांभळे, सुनिल जांभळे, सचिन पार्टे, सूर्यकांत देशमुख, सरांची कन्या सौ. गीतांजली निकम, जावई अमित निकम, बोंडारवाडी धरण कृती समितीचे पदाधिकारी, जावली तालुका पत्रकार संघाचे आजी-माजी पदाधिकारी, सदस्य, बेल्हे ता. जुन्नर येथील ओंबळे सरांचे माजी विद्यार्थी इत्यादी मान्यवर, तसेच नातेवाईक, मित्र परिवार व केडंबे ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.

      पत्रकार सुरेश पार्टे यांनी कार्यक्रमाचे सूत्र संचालन केले. मोहन जगताप यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी एकनाथ ओंबळे, मोहन जगताप, सुरेश पार्टे, नारायण शिंगटे, प्रशांत गुजर, संदीप गाडवे, संजय दळवी आदी पत्रकार मित्रांनी परिश्रम घेतले.


Post a Comment

0Comments
Post a Comment (0)