बिरमणी-हातलोट घाट" दोन दशकांचे न संपणारे अंतर आणि प्रतीक्षा
केळघर : प्रतिनिधी - ( टिम दिव्यदृष्टी नामा न्यूज ) -
बिरमणी-हातलोट घाट हा निश्चित रत्नागिरी व सातारा जिल्ह्याला जोडणारा महत्त्वाकांक्षी उपक्रम आहे. यामुळे स्थानिक पर्यटन, येथील दुर्मिळ जैवविविधता, दुर्लक्षित अशा ऐतिहासिक स्थळांच जतन आणि महत्व वाढवण्यास, व्यापार उदिम, दळणवळण तसेच घाटाशी संबंधित गावांमधील ग्रामस्थांचे, युवापिढीचे जीवनमान उंचावण्यास, आर्थिक उन्नयन होण्यास प्रचंड मदत होईल. यातच सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील जवळपास १८६ पर्यटन स्थळांमध्ये कांदाट खोऱ्याचा देखील समावेश आहे आणि हे खोर "बिरमणी-हातलोट घाटाशी संलग्न आहे. त्यामुळे या पर्यटन स्थळांच्या माध्यमातून, शासनाच्या विविध उपक्रमांतून घाटाशी संबंधित गावांना रोजगार, स्वयंरोजगाराच्या चांगल्या संधी उपलब्ध होऊ शकतात. परंतु, कोकण आणि पश्चिम घाटमाथ्याला गेली २० ते २२ वर्षे जोडू पाहणाऱ्या बिरमणी- हातलोट घाटाचे काम संथ गतीने सुरू आहे. दरवर्षी काही अंशी तुटपुंज्या निधीची तरतूद करून, थोड बहुत त्यातून रस्त्याचे काम साधून अठरा गाव बांदरी परिसरातील गावे आणि वरील घाट माथ्यावरील सातारा हद्दीतील गावे यांच्या तोंडाला वर्षानुवर्षे पाने पुसली जात आहेत ही सत्य परिस्थिती दुर्दैवाने मान्य करायला हवी. कारण प्रशासकीय आणि राजकीय इच्छाशक्ती असेल तर कोणताही उपक्रम प्रत्यक्षात आणणे मोठी गोष्ट नाही हे सर्वच जण मान्य करतील. थोडक्यात आजतागायत अपूर्ण अवस्थेत असलेल्या बिरमणी-हातलोट घाटाच्या निद्रिस्त, प्रलंबित उपक्रमास संपूर्णतः जबाबदार हे प्रशासन, लोकप्रतिनिधी व स्थानिक सर्वच राजकीय प्रस्थापित पक्षांची मतदारांच्या भवितव्याविषयी असलेली उदासीनता, मानसिकता कारणीभूत आहे हे कुणी नाकारू शकणार नाही. आजतागायत कोणत्या गावाने ग्रामस्थांनी या प्रकल्पास विरोध केला आहे का ? नाही ना ! म्हणजेच स्थानिक ग्रामस्थांना याची नितांत गरज आहे हे जगजाहीर आहे.
त्यामुळे, येत्या काळात अठरा गाव बांदरी परिसरातील व सातारा हद्दीतील घाट माथ्यावरील संबंधित गावे, त्यांच्या सामाजिक संस्था, मंडळे व समाजहितैशी मंडळी यांनी एकत्र येऊन या ‘गोगलगाय प्रवृत्तीच्या’ प्रशासन व राजकीय कारभाराला संविधानाने दिलेल्या अधिकारातून आपला असंतोष, रोष जाणवून दिला, संघर्षाला उभे राहिले तर त्यात नवल नव्हे. सोबत मुंबई-गोवा महामार्गा प्रमाणे रखडलेल्या या घाटाला जलदगतीने न्याय मिळावा यासाठी इथला प्रत्येक कोकणवासीय मग तो स्थानिक असो अथवा शहरी भागात राहणारा असो या कर्तव्यपूर्तीसाठी बांधील आहे याची प्रशासनाने व प्रस्थापित सर्वच राजकीय पक्षांनी नक्कीच आता नोंद घ्यायला हवी. अर्थात, अठरा गाव बांदरी पट्ट्यातील पर्यावरणपूरक ग्रामीण विकासासाठी, भूमिपुत्रांच्या सुख-समृद्धीसाठी किमान आठ गाव ‘राव’ मोरे परिवाराची ‘श्री कुंभाळजाई देवी सामाजिक विकास संस्था’ निश्चितच कटिबद्ध आहे. त्यामुळे येत्या काळात ज्या ज्या सामाजिक संघटनांना, मंडळांना ही भूमिका पटत असेल, सहमत असतील त्यांनी निश्चित एका वैचारिक व्यासपीठाच्या माध्यमातून एकत्र येऊन विचारमंथन करून एक ठोस निर्णायक भूमिका संघटीतरित्या सर्वानुमते घेणे आता काळाची गरज आहे असे आवाहन श्री कुंभाळजाई देवी सामाजिक विकास संस्थेचे अध्यक्ष विनोद सुरेशराव मोरे ( खेड ) संपर्क क्र. (9819053262) यांनी केले आहे .