जलपर्यटन प्रकल्पाचा ही घेतला आढावा...
मेढा - प्रतिनिधी - ( टिम दिव्यदृष्टी नामा ) पर्यावरणाच्या समतोलासाठी व शेतकऱ्यांना हमखास उत्पादन मिळावे म्हणून राज्य शासनाने बांबू लागवडीची योजना सुरू केली आहे. बांबू पासून अनेक उत्पादने घेता येतात यातून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फायदा होणार आहे. यासाठी राज्यातील शेतकऱ्यांनी गट शेतीच्या माध्यमातून जास्तीत जास्त बांबू लागवड करावी, असे आवाहन मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांनी केले.
दरे तालुका महाबळेश्वर येथे मुख्यमंत्री ना.शिंदे यांच्याहस्ते बांबू लागवड करण्यात आली. यावेळी ते बोलत होते.यावेळी कृषी मूल्य समितीचे अध्यक्ष पाशा पटेल, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्यासह प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते.
बांबू हे शेतकऱ्यांसाठी बहुद्देशीय उपयोगी पीक असल्याचे सांगून मुख्यमंत्री ना.शिंदे म्हणाले, शेतकऱ्यांना बांबू लागवड माध्यमातून जोड धंदा मिळवा म्हणून शासनस्तरावर प्रयत्न केले जात आहेत. ऊस लागवडीमधून साधारणतः हेक्टरी उत्पादन शंभर टन व भाव प्रति टन किमान अडीच हजार मिळतो. तर बांबू लागवडीमधून किमान हेक्टरी उत्पादन शंभर टन व भाव प्रति टन किमान चार हजार मिळतो.त्यामुळे शेतकरी आर्थिक दृष्ट्या सक्षम होणार आहेत.
जावली महाबळेश्वर तालुक्यातील कांदाटी खोऱ्यातील तरुणांना रोजगार मिळावा यासाठी बांबू पासून उत्पादन करणारा उद्योग उभारण्यात येणार आहे. त्याच बरोबर शहरी भागातील वाढते प्रदूषण पाहता शहरांमध्ये बांबू पार्क उभारण्यात येणार असल्याचा मानस ही मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांच्या दरे गावी व्यक्त केला.
जलपर्यटन प्रकल्पाचा आढावा....
पर्यटन वाढीसाठी कोयना जलाशयामध्ये जल पर्यटनास परवानगी देण्यात आली आहे. त्याअंतर्गत मुनावळे, ता. जावली येथे ४५ कोटी रुपयांचा प्रकल्प उभारण्यात येत आहे. त्यामध्ये स्कुबा डायव्हिंग, प्यॅरा ग्लायडिंग, स्पीड बोट, साहसी जल क्रीडा उभारण्यात येत आहेत. त्याच बरोबर पर्यटकांना मूलभूत सुविधाही उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यामुळे स्थानिकांना गावातच रोजगार मिळणार आहे.

