फोटो - कुसुंबी - श्री काळेश्वरी देवी, शेजारी मांढरची व वाखणची काळुबाई. ( छाया - गणेश गुरव , कुसुंबी )
केळघर : वार्ताहर - भाविकांचे श्रद्धास्थान आणि नवरात्र उत्सव यामुळे नवसाला पावणाऱ्या कुसुंबी येथील श्री काळेश्वरी देवीच्या दर्शनाला भाविकांची गर्दी होत असताना ६० वर्षे वयावरील महिलांचा काळेश्वरी विश्वस्तांच्यावतीने रविवार, दि. २२ रोजी सन्मान करण्यात येणार असल्याची माहिती अध्यक्ष रामदास वेंदे यांनी दिली.
नाचणीचे गाव तसेच तीर्थक्षेत्र असलेल्या कुसुंबी येथे नवरात्रोत्सवानिमित्त उतराई मातृऋणाची या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. गावातील पुरुषांचे सन्मान नेहमी होत असतात. मात्र महिलांचा सन्मान तितक्याशा प्रमाणात कुठेच होताना दिसत नाही आणि वयस्कर महिलांचा सन्मान तर कुठेच होताना दिसत नाही. त्यामुळेच काळेश्वरी देवस्थान ट्रस्ट, क्षेत्र कुसुंबी यांच्याकडून नवरात्रोत्सवानिमित्त आपल्या गावातील ६० वर्षांवरील महिलांचा सन्मान व्हावा तसेच त्यांच्या ऋणातून थोडे का होईना पण उतराई होता यावे यासाठी या महिलांचा सन्मान व चरण पूजन सोहळ्याचे आयोजन काळेश्वरी देवी ट्रस्टकडून करण्यात आले आहे.
रात्रभर देवीचे जागरण होणार आहे. मंदिरात होमहवन होणार असून रात्री १२ नंतर नऊ दिवस असणारे उपवास सोडले जाणार आहेत. नवरात्र कालावधीत भाविकांनी दुपारी व रात्री देवीच्या आरतीचा आनंद घेत दर्शन घेतले.