कुडाळ शाळेच्या परिसरातील धोकादायक वृक्ष हटवण्याची मागणी
चिमुकल्यांना जीव मुठीत धरून शिकावी लागतेय शाळा ; वनविभाग गांधारीच्या भूमिकेत
कुडाळ : प्रतिनिधी - ( टिम दिव्यदृष्टी नामा न्यूज ) -
जावली तालुक्यातील कुडाळ येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व अंगणवाडीच्या परिसरामध्ये मोठमोठी झाडे आहेत.ही झाडे जुनी असून पावसाळ्यामध्ये सोसाट्याचा वारा आला की याच्या फांद्या तुटून कधी शाळेवर तर कधी जमिनीवर येऊन पडत असतात.सध्या पावसाळा सुरू असून याचा मोठा धोका संभवत आहे.आशा परिस्थितीत शाळेतील व अंगणवाडीच्या मुला-मुलींना याठिकाणी शिक्षण घ्यावे लागत आहे.यामुळे मुलांच्या संरक्षणाचा प्रश्न निर्माण होत असून या परिसरातील धोकादायक स्थितीत असणारे वृक्ष तोडण्यात यावेत अशी मागणी पालकांमधून होऊ लागली आहे.
लहान मुले,पालक,शिक्षक यांची दररोज याठिकाणी ये-जा होत असते.तसेच याठिकाणी शिक्षकांची वाहने देखील या झाडाखाली लावण्यात येतात जर चुकून झाडाची फांदी पडल्यास मोठा अनर्थ होऊ शकतो.याबाबत जावली तालुक्यातील वन विभागाने पुढाकार घेऊन अंगणवाडी व शाळेच्या परिसरातील धोकादायक वाटणारी झाडे काढून टाकावीत अशी मागणी पालक तसेच ग्रामस्थ करू लागले आहेत.सध्या सर्वत्र पावसाचा जोर हळूहळू वाढू लागला आहे.त्यामुळे वेळेत या झाडांची योग्यरित्या विल्हेवाट लावण्यात आली नाही तर याचा फटका लहान मुलांना बसल्याशिवाय राहणार नाही.एखादी फांदी चुकून विद्यार्थ्यांच्या अंगावर पडली गेली तर याला जबाबदार कोण असा सवालही पालकांनी उपस्थित केला आहे.
याबाबत वारंवार वनविभागाकडे तक्रार करून देखील वनविभाग कोणतीही योग्य ती भूमिका घेत नसल्याचे पालकांसह ग्रामस्थांमधून बोलले जात आहे.त्यामुळे वेळेत या झाडाची विल्हेवाट लावावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
- वीरेंद्र शिंदे
जिल्हा दिशा समिती सदस्य
माजी सरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य कुडाळ


