वडिलोपार्जित जमिनीतून मूळ वारसांनाच केले बेदखल उशिरा माफीच्या नावाखाली प्रशासनाकडून वारस नोंद अपील फेटाळले जातायत प्रांत साहेबांच्या निकालावर महामूलकरांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित?

0

 


वडिलोपार्जित जमिनीतून मूळ वारसांनाच केले बेदखल

उशिरा माफीच्या नावाखाली प्रशासनाकडून वारस नोंद अपील फेटाळले जातायत

प्रांत साहेबांच्या निकालावर महामूलकरांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित?

कुडाळ : प्रतिनिधी - ( टिम दिव्यदृष्टी नामा न्यूज ) -

जावली तालुक्यातील दरे बुद्रुक येथे असणाऱ्या वडिलोपार्जित जमिनीतून मूळ वारसांना प्रशासनाकडून कागदोपत्री बेदखल केले असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.दरे बुद्रुक तालुका जावळी येथे वास्तव्यास असणारे मानसिंग धर्माजी महामुलकर यांना जमीन फेरफार क्रमांक 876 हा तलाठी व मंडल अधिकारी यांनी चुकीचा करून बेदखल केले असल्याचा प्रकार घडला आहे.याबाबत मानसिंग महामूलकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे प्रशासनाच्या गलथान कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून संबंधित तत्कालीन महसूल अधिकारी यांच्यावर कारवाई करून आम्हांला न्याय मिळावा अशी भूमिका मांडली आहे.

प्रसिद्धी पत्रकाद्वारे माहिती देताना महामुलकर यांनी सांगितले की,दरे बुद्रुक येथील जुना जमीन फेरफार नंबर 582 मध्ये माझ्या वडिलांचे व चुलत्याचे नाव नमूद होते असे असताना देखील वडिलांच्या निधनानंतर तलाठ्यांनी 876 हा नवीन जमिनी संदर्भात फेरफार बनवला यावर माझ्या चुलत्यांच्या सर्व मुलांची वारस नोंद घालण्यात आली परंतु आमची नावे 876 फेरफारमध्ये घातली गेली नाहीत.तसेच आम्हाला कोणतीही कायदेशीर नोटीस न देता फेरफार क्रमांक 876 मध्ये तत्कालीन तलाठ्यांकडून बदल करण्यात आला आहे.कायदेशीर बाबी व कागदोपत्री तपासणी न करता मनमानी कारभार करत चुकीच्या पद्धतीने 876 हा फेरफार बनवला आहे. सदर बाब आमच्या निदर्शनास आली त्यावेळी आम्ही प्रांत कार्यालय सातारा (जावली)येथे 876 या फेरफारला आव्हान दिले.सन 2024 पासून आज अखेर आमची केस प्रांत कार्यालय सातारा जावली येथे सुरू होती.या दाव्याचा नुकताच निकाल झाला आहे.यामध्ये दावा दाखल करण्यास विलंब झाला असल्याचे कारण पुढे देत आमचा दावा निकाली काढण्यात आला आहे.

वारस नोंद घालणे हे महसूल प्रशासनाचे काम असताना देखील आम्हांला जाणीवपूर्वक विलंबाचे कारण देऊन प्रांत साहेबांनी आमचा अर्ज निकाली काढला आहे.तसेच योग्य वारस नोंद करणे हे महसूल अधिकारी यांचे कर्तव्य आहे व महसुल अधिकारी यांनीच सर्व वारसांच्या कागदपत्रांची आणि सत्यतेची पडताळणी करून नंतरच वारस नोंद करावयाच्या असतात असे कायद्याचे बंधन आहे.त्यामुळे मला या सर्व निकाल प्रक्रियेवर शंका निर्माण होत आहे.तसेच प्रांत साहेब यांना वारंवार कळवून देखील मला निकाल देण्यास विलंब झाला आहे.तसेच माझ्या झालेल्या युक्तीवादातील मुद्द्यांचा निकाल प्रक्रियेत उल्लेख घेण्यात आला नाही.त्यामुळे प्रांत साहेबांनी आमचा दावा चुकीच्या पद्धतीने फेटाळला असल्याने वडिलोपार्जित जमिनीच्या मालकीतून आम्हांला बेदखल केले आहे.त्यामुळे माझे कशानेही न भरून येणारे नुकसान होणार असल्याची खंत मानसिंग महामुलकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे व्यक्त केली आहे.तसेच वारसनोंदीबाबत वरिष्ठ प्रशासनाकडून आमच्या सर्व कागदपत्रांची पूर्तता पहावी व आम्हाला योग्य तो न्याय मिळवून द्यावा अशी अपेक्षा मानसिंग महामुलकर यांनी प्रसिद्धी पत्रकातून व्यक्त केली आहे.तसेच मोठ्या प्रमाणात जिल्ह्यातील वारस नोंदी अपील हे विलंब झाल्याचे कारण पुढे देत अधिकाऱ्यांकडून फेटाळले जात असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.त्यामुळे माझ्यासह कित्येक तरी लोकांचे शारीरिक, मानसिक,आर्थिक नुकसान होत असून त्यांना न्याया पासून वंचित राहावे लागत असल्याचे मानसिंग महामुलकर यांनी प्रसिद्धी पत्रकार द्वारे सांगितले आहे.

जावली तालुक्यासह सातारा जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रशासनाकडे वारस नोंदीचे दावे प्रलंबित आहेत.परंतु प्रशासनाकडून दाव्यांबाबत विलंबाचे कारण पुढे देत दावे निकाली काढले जात आहेत.त्यामुळे कोर्टकचेरा खेळण्याकरिता लोकांकडे पुरेसे आर्थिक भांडवल नसते.जर प्रशासनानेच विलंबाचे कारण देत प्रकरणे निकाली काढली तर लोकांनी न्याय कोणाकडे मागायचा असा प्रश्न यावेळी उपस्थित केला जाऊ लागला आहे.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)