आंबेघर - ज्ञानदेव रांजणे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित स्नेहमेळाव्यात सत्कार करताना शिवेंद्रसिंहराजे भोसले. समवेत सदाशिव सपकाळ, वसंतराव मानकुमरे,अर्चना रांजणे, रुपाली वारागडे ,राजुभैय्या भोसले आदी.
विरोधकांनी पातळी सोडल्यास त्यांना जशास तसे उत्तर देण्याची धमक जावळीतील जनतेच्या आशीर्वादामुळे माझ्यात निश्चित आहे - सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले
केळघर : प्रतिनिधी- ( टिम दिव्यदृष्टी नामा न्यूज ) -
निवडणुका आल्या की जावळी तालुक्यातील विरोधकांना जावळी तालुक्यातील जनतेचा खोटा कळवळा येतो. मंत्रिपद असताना ,सत्तेवर असताना तालुक्याच्या विकासासाठी एकही दमडी निधी न देणाऱ्यांनी जनतेचा बुद्धिभेद करू नये. मी कधीही दादागिरी व दहशतीचे राजकारण केले नाही.विरोधकांनी पातळी सोडल्यास त्यांना जशास तसे उत्तर देण्याची धमक जावळीतील जनतेच्या आशीर्वादामुळे माझ्यात निश्चित आहे .असा इशारा सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी विरोधकांना दिला.
जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे यांच्या वाढदिवसानिमित्त आंबेघर येथे आयोजित स्नेहमेळावा व कुसुंबी जिल्हा परिषद गटातील विविध विकासकामांच्या भूमिपूजन व उद्घाटन प्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी माजी आमदार सदाशिव सपकाळ, वसंतराव मानकुमरे,जिल्हा बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे, राजू भैय्या भोसले, अर्चना रांजणे, सौरभ शिंदे, विठ्ठल देशपांडे, जयदीप शिंदे, पांडुरंग जवळ, मेढ्याच्या नगराध्यक्ष रुपाली वारागडे, नगरसेवक शिवाजीराव देशमुख, विकास देशपांडे, शिवाजी गोरे, रिकी तिवाटने ,सुशांत कांबळे, नितीन मगरे, तेजस्वी इगावे, आनंदी करंजेकर,पुष्पा मुकणे, सुनीता तांबे, अनघा करंजेकर,रामभाऊ शेलार, मोहनराव कासुर्डे, सुनील जांभळे, सागर धनावडे, विलासबाबा जवळ, बबन बेलोशे, हरिभाऊ शेलार,मारुती चिकणे आदींची उपस्थिती होती.
मंत्री शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, लोकशाहीत मतदार हा राजा आहे.जावळीतील जनतेने भरभरून प्रेम दिल्याने सलग तीन टर्म आमदार म्हणून मला जनतेची सेवा करण्याची संधी मिळाली आहे. भाजपच्या नेतृत्वाखाली तालुक्यात विकासकामे करत असून येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक भाजपच्या कमळ चिन्हावर लढवणार असून सर्व भाजपचे उमेदवार निश्चित निवडून येणार आहेत. मेढा नगरपंचायत निवडणुकीत भाजपचे उमेदवार विजयी झाले आहेत. भविष्यात नगरपंचायत ची नगर परिषद करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. मेढा शहरात विविध योजना राबवून मेढा शहर स्मार्ट सिटी होण्यासाठी काम करणार आहे. जावळी तालुक्यातील सर्व गावांतील स्मशानभूमीला जोडणारे पक्के रस्ते करण्यासाठी शासनाच्या माध्यमातून काम करत आहे. बोंडारवाडी धरण प्रकल्प मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील असून प्रकल्पग्रस्तांचे सर्व प्रश्न समनव्यायातून सोडवणार आहे. जावळी तालुक्यात पर्यटनाला चालना देण्यासाठी मंत्री म्हणून काम करत आहे. जावळी तालुक्यातील नागरी सुविधा परिपूर्ण होण्यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत. दिलेला शब्द पाळण्याचे काम स्व. भाऊसाहेब महाराज यांच्यापासून सुरू आहे. मी देखील दिलेला शब्द पाळतो त्यामुळे जावळीतील जनता नेहमीच माझ्या पाठीशी राहत आहे. जावळी तालुक्यातील जनतेमुळेच मला मंत्रिपद मिळाले आहे.विरोधकांनी तालुक्यात एकही विकासकामे केली नाहीत केवळ स्वार्थासाठी बाहेरून येणाऱ्या विरोधकांना जावळीतील जनता निश्चितच त्यांची योग्य जागा दाखवून देईल. जिल्हा बँकेचे संचालक रांजणे यांनी तालुक्यात विकासकामांसाठी नेहमीच पाठपुरावा केला असून रांजणे यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहू अशी ग्वाही मंत्री भोसले यांनी शेवटी दिली.
रांजणे म्हणाले, मंत्री भोसले यांनी तालुक्यातील वाड्या-वस्त्यांवर विकासकामे केली असून कुसुम्बि गटात ९१ गावे व ६५ बूथ असून प्रत्येक गावांत बांधणी करून येणाऱ्या निवडणुकीत विक्रमी मताधिक्याने सर्व उमेदवार निवडून आणण्यासाठी मंत्री भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणार असून विरोधकांना पुन्हा एकदा धोबीपछाड जनतेच्या आशीर्वादाने देणार आहे.केळघर-डांगरेघर पुलासाठी आठ कोटी रुपये व केळघर-डांगरेघर रस्त्यासाठी १० कोटी रुपये निधीचा प्रस्ताव नाबार्डच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.
रामभाऊ शेलार यांनी प्रास्ताविक केले., सुधाकर शेलार यांनी आभार मानले.कार्यक्रमास विविध गावचे सरपंच, उपसरपंच ,विविध संस्थांचे पदाधिकारी, महिला, युवक, कार्यकर्ते यांची उपस्थिती होती.
बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते कुसुंबी गटातील विविध विकासकामांचे भूमिपूजन व उद्घाटन करण्यात आले.
पुनवडी पूल - ११ कोटी रुपये.
आंबेघर येथे रामजी बुवा पूल - ८ कोटी रुपये.
वरोशी ते वाहिटे रस्ता - १० कोटी रुपये.
केळघर-कुरुळोशी रस्ता - अडीच कोटी रुपये.
मालचौंडी -दुंद रस्ता - अडीच कोटी.
वाटंबे ते केडंबे पुलासाठी
सहा कोटी रुपये

