केळघर - १९९२ च्या बॅचचे विद्यार्थी व शिक्षकवृंद
केळघरच्या श्री भैरवनाथ विद्यामंदिरच्या १९९२ बॅचचा ३४ वर्षांनंतर अविस्मरणीय स्नेहमेळावा ;शाळेला दिली डिजिटल रूम ची भेट
केळघर : प्रतिनिधी - ( टिम दिव्यदृष्टी नामा न्यूज ) -
येथील श्री भैरवनाथ विद्यामंदिर, केळघर येथील १९९२ च्या १० वी बॅचच्या ( इयत्ता ५ वी ते १० वी ) माजी विद्यार्थ्यांनी ३४ वर्षांनंतर एकत्र येत आपला स्नेहमेळावा अत्यंत उत्साहात साजरा केला. केवळ जुन्या आठवणींना उजाळा न देता, या विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेप्रती कृतज्ञता म्हणून एक सुसज्ज 'डिजिटल रूम' (फॉल्स सीलिंग, पेंटिंग व फ्रेमिंगसह) तयार करून शाळेला भेट दिली आहे.
प्रजासत्ताक दिन आणि डिजिटल रूमचे उद्घाटन २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शाळेच्या मैदानावर ध्वजारोहण आणि संचलनानंतर माजी विद्यार्थ्यांचा सत्कार व भाषणे झाली. यानंतर विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या डिजिटल रूमचे उद्घाटन माजी शिक्षक यु एम दरेकर सर आणि पी एस नलावडे सर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळेस शाळेचे मुख्याध्यापक एस व्ही जाधव सर तसेच माजी शिक्षक एस पी कदम सर, टी आर ओंबळे सर, ए एस शेख सर, एस एम शेडगे सर, एस व्ही वगरे सर, बाजीराव धनावडे सर तसेच स्कूल कमिटीचे सदस्य , उद्योजक राजेंद्र धनावडे आणि राजेंद्र गाढवे , बळवंत पाडळे गुरुजी, बाजीराव धनावडे सर, दरेकर सर आणि माजी विद्यार्थी आनंदा बेलोशे आणि सौ अरुणा चव्हाण यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
शाळेतील कार्यक्रमानंतर स्वामी समर्थ मंगल कार्यालय येथे मुख्य सोहळा पार पडला. दीपपूजन, सरस्वती पूजन आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. भारतीय संस्कृतीचे जतन करत विद्यार्थ्यांनी आपल्या 8 निवृत्त शिक्षकांचे पाय धुवून गुरुपूजन केले. त्यांना शाल-श्रीफळ व भेटवस्तू देऊन सन्मानित केले. विशेष म्हणजे, या बॅचच्या सर्व मित्र-मैत्रिणींनी एकत्र केक कापून आपला ५० वा वाढदिवस साजरा केला.
परिचय सत्रात ३४ वर्षानंतर सर्वांची एकमेकांना नव्याने ओळख झाली. विद्यार्थ्यांनी केलेल्या आदर सत्कारामुळे सर्व शिक्षक प्रसन्न झाले आणि अत्यंत भावुक होत त्यांनी सर्वांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात संगीत खुर्ची आणि गरब्याचा आनंद घेत सर्वजण पुन्हा एकदा शालेय जीवनात हरवून गेले होते.
प्रजासत्ताक दिन, डिजिटल रूमचे लोकार्पण आणि ३४ वर्षांनंतर स्नेहसंमेलन असा हा 'त्रिवेणी संगम' इतर माजी विद्यार्थी बॅचेससाठी प्रेरणादायी ठरणार आहे. या अभूतपूर्व सोहळ्याचे आयोजन केल्याबद्दल १९९२ बॅचचे सर्वत्र कौतुक होत आहे.


