भाजपाच्या अनघा करंजेकर व आनंदी करंजेकर प्रभाग क्रमांक ४ व ५ मधून बिनविरोध
एकाच भावकीतील दोघी नात्याने सासू - सून
मेढा : प्रतिनिधी - ( टिम दिव्यदृष्टी नामा न्यूज ) -
मेढा नगर पंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली असून प्रभाग क्रमांक ४ मधील अनघा (छकुली ) अक्षय करंजेकर व प्रभाग क्रमांक ५ मधील श्रीमती आनंदी यशवंत करंजेकर या एकाच भावकीतील आणि नात्याने सासू - सून लागणाऱ्या भाजपाचे दोन उमेदवार बिनविरोध निवडून येत भाजपात उत्साहाचे वातावरण निर्माण केले आहे .
मेढा नगरपंचायत ही राज्यातील सर्वात छोटी नगरपंचायत असून येथे एकूण ४०२६ एवढे मतदान आहे यापैकी प्रभाग क्रमांक ४ मध्ये पुरुष ९६ ,स्त्रिया १०६ असे एकूण - १९९ एवढे मतदान होते येथून अनघा (छकुली ) अक्षय करंजेकर या तर प्रभाग क्रमांक ५ मध्ये पुरुष ८५ , व स्त्रिया ८५ असे एकूण १७० एवढे मतदान असून येथून आनंदी यशवंत करंजेकर या बिनविरोध निवडून आल्या असून त्यांचे माहेर केळघर येथील आहे तर अनघाचे माहेर मेढाच आहे . या दोघी एकाच भावकीतील असून त्या नात्याने एकमेंकीच्या सासू - सून लागतात .
दरम्यान दोन प्रभाग बिनविरोध झाल्याने उर्वरित १५ प्रभागामध्ये ३९ उमेदवार रिंगणात असून ७ प्रभागामध्ये तिरंगी तर ७ प्रभागामध्ये दुरंगी तर प्रभाग क्रमांक ९ मध्ये चौरंगी लढत पाहायला मिळेल . नगराध्यक्ष पदासाठी भाजपा , शिवसेना ( शिंदे गट ) व अपक्ष असे तीन उमेदवार आपले नसीब अजमावत आहेत . प्रभाग क्रमांक ४ व ५ येथील उमेदवार बिनविरोध निवडून आले असले तरी येथील मतदारांना नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारासाठी मतदान करण्यासाठी बाहेर पडावे लागेल . येथील निवडणुक ही स्थानिक पातळीवरील समस्या , अडी अडचणीवर आदि मुद्दे मांडत लढली जात आहे . यामध्ये हे मुद्दे घेऊन ते सोडविण्यासाठी प्रयत्न करू , हे मतदारांपुढे मांडण्यात कोण प्रभावी ठरतयं हे पाहणं औसुक्याच ठरणार आहे .


