मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते कोयना जल पर्यटन शुभारंभ

0

 


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते कोयना जल पर्यटन शुभारंभ


जल पर्यटन प्रकल्पाच्या माध्यमातून पर्यावरण पूरक विकास आणि स्थानिकांना रोजगारास प्राधान्य

- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


केळघर : प्रतिनिधी - ( टिम दिव्यदृष्टी नामा न्यूज ) -

कोयना जल पर्यटन केंद्र हे देशातील गोड्या पाण्यातील सर्वात मोठे जल पर्यटन केंद्र असून या माध्यमातून पर्यावरण पूरक विकास आणि स्थानिकांना रोजगार या बाबींना प्राधान्य देण्यात येणार आहे असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.


सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील मुनावळे येथे कोयना जलाशय (शिव सागर) तीर येथे महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विकास महामंडळाच्या कोयना जल पर्यटन शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाला. यावेळी आयोजित समारंभात ते बोलत होते याप्रसंगी उद्योग मंत्री उदय सामंत, राज्य उत्पादन शुल्क मंत्री आणि सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराजे देसाई, ज्येष्ठ सिने अभिनेते पद्मश्री नाना पाटेकर, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार मकरंद पाटील, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक समीर शेख, एमटीडीसीच्या व्यवस्थापक श्रीमती शर्मा, जलसंपदा विभागाचे अरुण नाईक आणि जयंत शिंदे, महाराष्ट्र पर्यटन विकास प्रकल्पाचे सल्लागार सारंग कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती.



मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले,

 सह्याद्रीच्या कुशीत प्रचंड निसर्ग सौंदर्य लपलेले आहे. त्याला चालना देण्यासाठी पुढाकार घेण्याची आवश्यकता होती. त्यासाठी ऑफिशियल सिक्रेट अॅक्ट काढल्याने या परिसराच्या विकासाला चालना मिळाली आहे. मासेमारी, बोटिंग, जल पर्यटन यासाठी या बाबीचा फायदा होणार आहे. मात्र विकास करत असताना तो कोणत्याही परिस्थितीत पर्यावरण पूरक असला पाहिजे. पाणी प्रदूषित होता कामा नये. तसेच स्थानिक लोकांना या ठिकाणी रोजगार मिळाला पाहिजे अशा सूचना पर्यटन विभागाला आपण दिल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

 




कार्यक्रमाचे प्रास्ताविक आ. श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले. यावेळी त्यांनी जल पर्यटन प्रकल्पामध्ये स्थानिकांनाच रोजगार मिळावा, त्यासाठी त्यांना प्रशिक्षण देण्यात यावे, मुनावळे गावचे सातबारे खातेदारांच्या नावावर करून मिळावेत, अन्य उर्वरित रखडलेले प्रकल्पही मार्गी लावावेत, जलाशयात मासेमारीचे परवाने मिळावेत अशा मागण्या केल्या.


कार्यक्रमाच्या सुरुवातीस पर्यटन विकास विभागाच्या कोयना जल पर्यटन केंद्राचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांच्यासह अन्य मान्यवरांनी काउंटरवर तिकीट खरेदी केले. या कार्यक्रमात स्थानिक तरुणांना प्रातिनिधीक स्वरूपात रोजगाराची नियुक्तीपत्रे देण्यात आली. कार्यक्रमासाठी

उपविभागीय अधिकारी सुधाकर भोसले, सरपंच श्री. भोसले, विविध विभागांचे अधिकारी, पदाधिकारी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते .





Post a Comment

0Comments
Post a Comment (0)