जावली तालुक्यातील उर्वरित मंडलातही दुष्काळ जाहिर करावा -शेतकऱ्यांची मागणी
केळघर : प्रतिनिधी ( टिम दिव्यदृष्टी नामा ) - मान्सूनचे प्रमाण घटल्याने राज्यात दुष्काळ जाहिर केला असून यामध्ये जावली तालुक्यातील मेढा , केळघर , करहर व बामणोली मंडलाचा समावेश करावा . अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे .
जावली तालुका हा भौगोलिकदृष्ट्या दुर्गम , डोंगराळ आहे . येथील भात हे प्रमुख पिक असून येथील शेती पावसावर अवलंबून आहे . यावेळी मान्सून पूर्व पावसाने ओढ दिल्याने खरीप हंगामातील पिके घेताना पुरेसे पर्जन्यमान नव्हते . मध्यंतरी थोडेफार पाऊस झाला . त्यावर शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील भाताची लागण केली तर इतर कडधान्ये पिके वाया गेली . गेली महिन्याभरात मेढा , केळघर , बामणोली आणि करहर परिसरात पाउस न पडल्याने भात पिके परिपक्क झाली नाहीत . परिणामी भात पिकाच्या उत्पादनात घट होणार आहे .
तर एकूणच पर्ज्यन्यमान कमी झाल्याने तसेच सध्या परतीच्या मान्सूनचा सरी न पडल्याने सध्या जमीनीत पुरेसा ओलावा नसल्याने याचा फटका रब्बी हंगामाला बसणार आहे . आताच परिसरातील ओढेनाले आटले आहेत . त्यामुळे गव्हू , हरभरा पिकाचेही क्षेञ घटणार असून पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवणार आहे .
राज्यातील नुकताच ४० तालुक्यात दुष्काळ जाहिर केला असून यामध्ये जावली तालुक्यातील कुडाळ व आनेवाडी या दोनच मंडलाचा समावेश केला आहे . माञ या व्यतिरिक्त असणाऱ्या मेढा , केळघर , करहर व बामणोली मंडलात वेगळी परिस्थिती नाही . माञ केवळ जून ते सप्टेंबर महिन्यात पर्जन्यमान जास्त म्हणून हे विभाग वगळे आहेत . हा अन्याय असून या विभागातील पिके हातची गेली असून शेतकरी वर्ग हताश झाला आहे . या मेढा , केळघर , करहर व बामणोली मंडल दुष्काळी म्हणून जाहीर करावा . अशी या विभागातील शेतकऱ्यांची मागणी आहे .


