केळघर - ( टिम दिव्यदृष्टी नामा) आश्विन शुद्ध दशमीला विजयादशमी अर्थात दसरा हा मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. साडेतीन मुहुर्तांपैकी एक असणाऱ्या दसऱ्याच्या दिवशी आपट्याच्या पानांच्या रूपात ‘सोनं' एकमेकांना देऊन शुभेच्छा देत हा सण साजरा केला जातो. विजयादशमीच्या दिवशी भगवान राम यांनी लंकापती रावण यांचा वध करून विजय मिळवला होता. तसेच या दिवशी रावणाचा पुतळा तयार करुन त्याचे दहन केले जाते. या व्यतिरिक्त नवरात्रौत्सवाचा अखेरचा दसऱ्याचा दिवस असल्याने देवीचे विसर्जन केले जाते. रावणाचा पुतळा दहन करताना प्रत्येकजण वाईट गोष्टींचा अंत करुन उत्तम मार्गावर जाण्याचा संकल्प करतात. शमीच्या किंवा आपट्याच्या झाडाची पूजा करत अपराजिता देवीची स्थापना करावयाची आणि तिला प्रार्थना करावयाची की, मला विजयी कर. त्यानंतर योद्ध्यांनी शस्त्र पूजन, व्यापाऱ्यांनी व्यापारासाठी प्रयाण व सरस्वतीपूजन करायचे अशी प्रथा होती. मुले पाटीवर सरस्वतीचे प्रतीकात्मक चित्र काढून त्या पाटीची पूजा करतात. पुस्तकांची आणि वह्यांचीही पूजा होते. प्रारंभी हा एक कृषिविषयक लोकोत्सव होता. पेरलेल्या शेतातील पहिले पीक यावेळी घरात येई, त्यावेळी शेतकरी हा उत्सव करीत असत. ग्रामीण भागात शेतातील धान्याचा तुरा आपल्या फेट्यात लावण्याची पद्धतीही प्रचलित आहे. काही लोक ते कानांवर खोचतात तर काही टोपीवर लावतात. साडेतीन मुहूर्तातील एक मुहूर्त मानल्या गेलेल्या विजयादशमीला एखाद्या नवीन कार्याची सुरुवात करतात. नवी वाहने, वास्तू तसेच कपड्यांची खरेदी, सोन्याची खरेदी होते.
आपट्याची पाने, झेंडुची फुले,
घेऊन आली अश्विनातली विजयादशमी,
दसऱ्याच्या आज शुभ दिनी,
सुख-सम्रुद्धी नांदो आपल्या जीवनी ..!
* दिव्यदृष्टी नामा * न्यूज परिवारातर्फे आपणाला व आपल्या कुटूंबाला विजयादशमी
(दसऱ्याच्या) हार्दिक शुभेच्छा . - (संजय दळवी , पत्रकार )